भारताचे चीनच्या नादी लागलेले एकेक शेजारी धराशायी पडू लागले आहेत. श्रीलंकेनंतर गेल्या बऱ्याच काळापासून तग धरलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था आता कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे. यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी मोठा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानने महागड्या, चैनीच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी आणली आहे. यामध्ये मोबाईल, कार, घरगुती उपकरणे, शस्त्रास्त्रे आदी अत्यावश्यक नसलेल्या वस्तू आहेत. आपत्कालीन आर्थिक योजनेनुसार ही बंदी लादण्यात आली आहे. शरीफ यांनी गुरुवारी ट्विट करून याची माहिती दिली. यामुळे पाकिस्तानकडील परदेशी चलनाची बचत होईल, असा दावा त्यांनी केला.
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची किंमत खूपच घसरली आहे. एका डॉलरमागे २०० पाकिस्तानी रुपये मोजावे लागत आहेत. पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब यांनी सांगितले की, ज्या विदेशी वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे त्यामध्ये कार, फोन, ड्रायफ्रूट्स, मांस, फळे, फर्निचर, घरगुती उपकरणे, शस्त्रे, मेकअप, शॅम्पू, सिगारेट आणि संगीत वाद्ये यांचा समावेश आहे. या वस्तूंचा वापर सामान्य जनतेकडून केला जात नाही.
आम्ही आत्मसंयम ठेवून सर्वतोपरी प्रयत्न करू. देशातील आर्थिकदृष्ट्या मजबूत लोकांनी पुढे येऊन सरकारच्या या प्रयत्नात नेतृत्व केले पाहिजे, जेणेकरून इम्रान खान सरकारने वंचित लोकांवर लादलेले हे ओझे दूर करता येईल, असे ट्विट शाहबाज शरीफ यांनी केले आहे.