ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. १५ - काश्मीरमधल्या हिंसाचाराला कारणीभूत ठरलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला पाकिस्तानने 'शहीद' घोषित केले आहे. मागच्या शुक्रवारी सुरक्षापथकांनी चकमकीत बुरहानला कंठस्नान घातले होते. काश्मीरी जनतेच्या समर्थनार्थ १९ जुलै काळा दिवस म्हणून साजरा करणार असल्याचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शुक्रवारी सांगितले.
लाहोरमध्ये बोलवलेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत त्यांनी काश्मीरमुद्यावर चर्चा केली. काश्मीरमधली चळवळ ही काश्मीरी स्वातंत्र्याची चळवळ आहे असे शरीफ म्हणाले. अधिकारांसाठी काश्मीरी जनतेची जो संघर्ष सुरु आहे. त्यामध्ये पाकिस्तान काश्मीरीजनतेला नैतिक, राजकीय आणि कुटनितीक समर्थन देत राहील असे शरीफ यांनी सांगितले.
स्वातंत्र्य चळवळीच बुरहान शहीद झाला आहे. भारताकडून जे क्रौर्य दाखवले जातेय त्यामुळे काश्मीरच्या स्वातंत्र्य संघर्षाला अधिक बळच मिळणार आहे. काश्मीरी जनतेला त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी पाकिस्तान ठामपणे त्यांच्या मागे उभा आहे अशी मुक्ताफळे शरीफ यांनी उधळली आहेत. आतंरराष्ट्रीय स्तरावर काश्मीरचा मुद्दा अधिक ठळकपणे मांडा असे निर्देश शरीफ यांनी दिले.