इस्लामाबाद: भारताचं क्षेपणास्त्र काल चुकून पाकिस्तानमध्ये पडलं. याबद्दल भारतीय संरक्षण मंत्रालयानं खेद व्यक्त केला. आता पाकिस्ताननं या प्रकरणी संयुक्त चौकशीची मागणी केली आहे. आमच्या हद्दीत कोसळलेलं क्षेपणास्त्र कोणतं होतं, त्यात कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता, असे प्रश्न पाकिस्तानकडून उपस्थित करण्यात आले आहेत.
तांत्रिक बिघाडामुळे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याची माहिती भारतीय संरक्षण मंत्रालयानं दिली. यामध्ये कोणतीही जीवितहानी, वित्तहानी झाली नाही. भारतीय सैन्यानं या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र यावरून पाकिस्ताननं आक्रमक भूमिका घेतली आहे. सुरक्षेचे प्रोटोकॉल आणि तांत्रिक सुरक्षेचे उपाय यावरून पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानं भारताला सुनावलं आहे.
क्षेपणास्त्र दुसऱ्या देशाच्या हद्दीत कोसळणं गंभीर बाब आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेलं स्पष्टीकरण पुरेसं नाही, असं पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रकरणी पाकिस्ताननं भारतावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. दोन्ही देशांकडे अण्वस्त्रं आहेत. भारताचं क्षेपणास्त्र पडल्यावर आम्ही प्रत्युत्तरादाखल कारवाई केली असती तर काय झालं असतं, असा सवाल पाकिस्ताननं विचारला आहे.
क्षेपणास्त्र लॉन्च करताना अपघात झाल्यास, आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यास काय करायचं, कोणते उपाय करायचे याची तयारी भारतानं करायला हवी, असा सल्ला पाकिस्ताननं दिला आहे. पाकिस्तानी जमिनीवर कोसळलेलं क्षेपणास्त्र कोणतं होतं, त्याची वैशिष्ट्यं काय होती, याची माहिती पाकिस्ताननं मागवली आहे. भारत नियमित देखभालीदरम्यान क्षेपणास्त्र डागतो का, असा प्रश्न पाकिस्ताननं उपस्थित केला आहे.