इस्लामाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यासाठी हवाई हद्द वापरण्यास पाकिस्तानने नकार दिला आहे.
न्यूयॉर्क येथे आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जाणाऱ्या नरेंद्र मोदींच्या विमानाला हवाई हद्दीची परवानगी मिळावी, यासाठी भारताने पाकिस्तानकडे विनंती केली होती. मात्र, पाकिस्तानकडून ही नाकारण्यात आली आहे. पाकिस्तान नरेंद्र मोदींच्या विमानासाठी आपल्या हवाई हद्दीचा वापर करू देणार नाही. यासंदर्भात आम्ही भारतीय उच्चायुक्तांना कळविले आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सांगितले आहे.
21 ते 27 सप्टेंबरदरम्यान न्यूयॉर्क येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नरेंद्र मोदी जाणार आहेत. यासाठी भारताकडून नरेंद्र मोदींच्या विमानाला हवाई हद्दीची परवानगी मिळावी, अशी विनंती पाकिस्तानला केली होती. मात्र, ती फेटाळल्याने भारताने नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, याआधीही भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाकिस्ताने आपल्या हवाई हद्दीतून जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी रामनाथ कोविंद आईसलँडच्या दौऱ्यासाठी जाणार होते.