Pakistan Army News: पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. आयएमएफनेही पाकिस्तानला अजुनही कर्ज दिलेले नाही. गेल्या काही महिन्यांपासून पीठ, मीठ, तेलांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. आता यातून बाहेर पडण्यासाठी लष्कराची मदत घेतली जाणार आहे.
पाकिस्तानातील नागरिक जीवनाश्यक वस्तुंसाठी प्रमाणापेक्षा जास्त पैसे मोजत आहे. सध्या पैशांसाठी आयएमएफ आणि जगासमोर हात पसरावे लागत आहे. या सर्व संकटांच्या काळात आता पाकिस्तान लष्कर शेती करणार आहे. पाकिस्तान सरकारने लष्कराला ४५ हजार एकर जमीन दिली आहे, ज्यामध्ये ते 'कॉर्पोरेट अॅग्रीकल्चर फार्मिंग' करणार आहे.
पिकांचे उत्पादन वाढावे यासाठी पाकिस्तानी लष्कराला शेती करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकल्प संयुक्त उपक्रमात असणार आहे. प्रकल्प यशस्वी करण्यासाठी लष्कर व्यवस्थापन स्तरावर भूमिका बजावेल. जमिनीची मालकी प्रांतीय सरकारकडे राहील. कॉर्पोरेट अॅग्रिकल्चर फार्मिंगमधून सैन्याला कोणताही फायदा किंवा महसूल मिळणार नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितले. ४५,२६७ एकर जमिनीवर कॉर्पोरेट कृषी शेती सुरू केली जाईल. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जाणार आहे.
ही कसली 'आई'? 3 वर्षांचा लेक वेदनेने तडफडत होता अन् 'ती' Video बनवत राहिली, अखेर...
अन्न सुरक्षा आणि शेतजमिनीमध्ये पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी लष्कर दरवर्षी भूमिका बजावते. काराकोरम महामार्गाच्या बांधकामासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पांचाही लष्कराचा भाग होता. आता कृषी उत्पादन वाढविण्यासाठी आपली भूमिका बजावण्याचे ठरवले आहे. टप्प्याटप्प्याने पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पात कॉर्पोरेट कंपन्याही सहभागी होणार आहेत. आधुनिक आणि यांत्रिक शेतीसाठी स्थानिक लोकांना प्रकल्पाचा भाग बनवले जाईल, असंही सांगण्यात येत आहे.