Pakistan Economic Crisis : पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत सापडला आहे. अजुनही आयएमएफने कर्जाचा पुरवठा केलेला नाही, तर दुसरीकडे महागाई गगनाला भिडली आहे. पीठ, तेल, डाळींच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ असून सर्वसामान्य जनतेचे हाल सुरू आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यात एका ट्रकजवळ पीठासाठी लोकांची चेंगरा चेंगरी सुरू असल्याचे दिसत आहे.
एक ट्रक आहे. याजवळ सुमारे ५० जण ट्रकमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत. २० हून अधिकजण ट्रकवर चढले आहेत. जे खाली उभे आहेत ते कोणत्याही परिस्थितीत ट्रकच्या वर चढण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रकच्या वर असणारे लोक ट्रकमध्ये भरलेली पोती खाली फेकत आहेत. काहींना लोक पकडतात आणि काही पोती फुटतात. यात पीठ भरलेलं आहे, असं या व्हिडीओत दिसत आहे.
कंगालीच्या वाटेवर असलेल्या Pakistan मध्ये लोकांचे हाल; उपचार महागले, औषधांचा तुटवडा
हा व्हिडीओ पाकिस्तानमधील पेशावर येथील आहे, पीठासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. पेशावरमध्ये २० किलोच्या पिठाच्या पोत्याची किंमत ३,००० रुपये झाली आहे. बलुचिस्तानमध्येही पिठाचा तुटवडा कायम आहे. येथे ६ जानेवारी रोजी २० किलो पिठाचा भाव २,८०० रुपये होता. क्वेटा आणि बलुचिस्तानच्या उर्वरित भागात पिठाचे भाव गगनाला भिडले आहेत. यापूर्वी पिठाच्या किमतीत आणखी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याआधी व्हिडिओमध्ये बलुचिस्तानमध्ये स्वस्त दरात पिठाची पोती मिळवण्यासाठी लोक आपापसात भांडताना दिसत होते. लाहोरमध्ये १५० रुपयांच्या वाढीनंतर १५ किलो पिठाची पोती आता २,००० रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. त्याचवेळी १५ किलो मैद्याच्या किमतीत अवघ्या दोन आठवड्यात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.
कराचीमध्ये १५५ रुपये किलोपर्यंत पीठ विकले जात आहे. सिंध प्रांतातील हैदराबाद शहरात २० किलो पिठाची किंमत २,८०० रुपयांहून अधिक, क्वेटामध्ये २,७०० रुपयांहून अधिक, सुक्कूरमध्ये २,७०० रुपये आणि पेशावरमध्ये २,६५० रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवणे पाकिस्तान सरकारला अवघड वाटते. मैद्याबरोबरच इतर वस्तूंचे भावही गगनाला भिडले आहेत.