गेल्या काही वर्षांपासून दिवळखोरीच्या उंबरठ्यावर महागाईला थोपवून धरलेला पाकिस्तान लवकरच धारातीर्थी पडणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजकीय संकट होते, याच आठवड्यात पाकिस्तानला नवीन पंतप्रधान मिळालेला आहे. असे असले तरी पाकिस्तानची परिस्थिती श्रीलंकेसारखी होण्याची दाट शक्यता आहे.
दहशतवाद आणि भारतद्वेष यामुळे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. यामुळे पाकिस्तानी जनतेवर महागाईचा अणुबॉम्ब फोडण्याची तयारी सुरु झाली आहे. जर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला तर पाकिस्तानातील पेट्रोल, डिझेलच्या किंमती एकाच झटक्यात दुप्पट होणार आहेत.
पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर ठरविणारी संस्था Oil and Gas Regulatory Authority (OGRA) ने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शनिवारपासून मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ओजीआरएच्या प्रस्तावानुसार पेट्रोलच्या दरात 83.5 रुपये प्रति लीटर आणि डिझेलच्या दरात 119 रुपये प्रती लीटर दरवाढ करण्याचा सल्ला आहे.
सध्या पाकिस्तानातील पेट्रोलचे १ एप्रिलचे दर 149.86 रुपये आणि डिझेलचा दर 144.15 रुपये आहे. या प्रस्तावानुसार पेट्रोलचा दर 233 रुपये आणि डिझेलचा दर 263 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. या संस्थेने आणखी एक प्रस्ताव दिला आहे. पहिल्या प्रस्तावात ग्राहकांवर कराचे ओझे वाढविणे आणि दुसऱ्या प्रस्तावात ग्राहकांवर कमी प्रमाणावर कराचे ओझे टाकले जाते. या दुसऱ्या प्रस्तावानुसार पेट्रोलच्या दरात २१ रुपयांची वाढ आणि डिझेलच्या दरात ५१ रुपयांची वाढ प्रस्तावित केली आहे. आता शाहबाज शरीफ कोणता प्रस्ताव निवडतात हे लवकरच समजणार आहे.