इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान बनण्याआधी पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पार्टीचे अध्यक्ष इम्रान खान यांना लिखित स्वरुपात माफी मागावी लागणार आहे. इम्रान खान यांच्यावर चिथावणीखोर भाषण आणि निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने त्यांना लिखित स्वरुपात माफी मागण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने इम्रान खान यांचे वकील बाबर अवान यांना सांगितले की, इम्रान खान यांनी शुक्रवारपर्यंत माफीनामा दाखल करावा. या माफिनाम्यावर इम्रान खान यांचे हस्ताक्षर असावे, असेही सांगितले आहे. इम्रान खान यांच्यावर निवडणूक प्रचारावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात अर्वाच्च भाषेचा वापर करणे, चिथावणीखोर भाषण देणे आणि निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त न्यायाधीश सरदार मोहम्मद रजा (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य असलेल्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी इम्रान खान, मौलाना फजलूर रगमान, सरदार सादिक आणि परवेझ खटक यांनी समज दिली. पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इम्रान खान यांचा तेहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.
... आधी माफी मागा, मगचं पंतप्रधानपदी विराजमान व्हा!; इम्रान खान यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 9:18 PM