Pakistan Imran Khan:पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत आता वाढ होणार आहे. ताज्या माहितीनुसार इम्रान खान यांना कधीही अटक होऊ शकते. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्याप्रकरणी इम्रान खानसह 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्ताधारी पक्ष पीएमएल-एनच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, मदिना येथे जे काही घडले ते इम्रान खान यांच्या इशाऱ्यावर घडले.
पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांच्या वतीने माध्यमांमध्ये सांगण्यात येत आहे की, सौदी अरेबियातील मदीना मध्ये झालेल्या घोषणाबाजी प्रकरणात माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या सत्ताधारी पक्षाकडून माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सांगण्यावरून ही घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
इम्रानसह या लोकांवर खटलापाकिस्तानातील फैसलाबादमध्ये गेल्या शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) चे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान इम्रान खान, त्यांच्या सरकारमधील मंत्री फवाद चौधरी आणि माजी पंतप्रधान शाहबाज गुल शेख रशीद यांचे माजी सल्लागार, नॅशनल असेंब्लीचे माजी उपसभापती कासिम सुरी यांचा समावेश आहे. जवळचे सहकारी अनिल मुसरत आणि साहिबजादा जहांगीर यांच्यासह 150 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मदिनामध्ये नेमकं काय झालं?पाकिस्तानचे नवनिर्वाचीत पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना सौदी अरेबियात मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. शरीफ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ तीन दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर गेले होते. यादरम्यान हे शिष्टमंडळ मदिना येथील मस्जिद-ए-नबावी येथे पोहोचले असता, लोकांनी मोठ्याने 'चोर-लुटेरे परत जा...' अशा घोषणा सुरू केल्या. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.