ऑनलाइन लोकमत
कराची, दि. ११ - एका खटल्यादरम्यान न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात आलेल्या हँड ग्रेनेडचा कोर्टातच स्फोट झाल्याने २ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना पाकिस्तानातील कराची येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कराचीतील स्थानिक दहशतवादविरोध न्यायालय क्रमांक ३ येथे सोमवारी एका संशयितविरोधात बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी महत्वपूर्ण खटला सुरू होता. त्यावेळी पोलिसांनी पुरावे म्हणून काही शस्त्रे व स्फोटके सादर केली होती. मात्र त्यापैकी एका हँड ग्रेनेडचा अचानक स्फोट झाला आणि एका पोलिसासह न्यायालयातील एक कर्मचारी जखमी झाला. त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ' हा बॉम्ब निकामी कसा करायचा याची माहिती आहे का असा सवाल न्यायाधीशांनी पोलिसांना विचारला असता, त्यांनी होकार दर्शवत त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हँड ग्रेनेडची पिन काढली आणि परिणामी कोर्टात मोठ्ठा स्फोट झाला.'
दरम्यान या घटनेनंतर कोर्टातील इतर सर्व खटल्याची सुनावणी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.