श्रीलंकेनंतर पाकिस्तानलामहागाईचा सामना करावा लागत आहे. आधी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रचंड वाढले होते. त्यानंतर आता भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहत. लाइव्हमिंटनुसार, लाहोर, इस्लामाबादसह अनेक मोठ्या शहरांमध्ये भाज्या आणि फळांच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानंतर आता पाकिस्तान सरकार भारतातून कांदा-टोमॅटो आयात करण्याचा विचार करत आहे. पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, वापराच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याचे बाजारातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच किरकोळ बाजारात फळे आणि भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
रविवारी लाहोरच्या बाजारात टोमॅटोचा भाव 500 रुपये किलो तर कांद्याचा भाव 400 रुपयांवर पोहोचला होता. लाहोरमधील घाऊक व्यापारी सांगतात की काही ठिकाणी घाऊक किंमती 100 रुपयांच्या आसपास आहेत, पण किरकोळ बाजारात जाताना त्याची किंमत चार-पाच पटीने वाढते. ते म्हणाले की, बलुचिस्तान, सिंध आणि दक्षिण पंजाबमधील पूरस्थितीमुळे भाजीपाला उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून येत्या काही दिवसांत भाजीपाल्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
700 रुपये किलोपर्यंत पोहोचेल किंमत
घाऊक व्यापारी जवाद रिझवी यांचे म्हणणे आहे की, गंभीर पूरस्थिती आणि घसरलेले उत्पादन पाहता, लवकरच ठोस पावले उचलली नाहीत, तर टोमॅटो आणि कांद्याचे भाव येथे 700 रुपये किलोपर्यंत पोहोचतील. जीवनावश्यक भाज्यांमध्ये समाविष्ट असलेल्या बटाट्याचे दरही 40 रुपयांवरून 120 रुपये किलो झाले आहेत.
बाघा बॉर्डरवरून मागवला जाईल कांदा-टोमॅटो
सध्या अफगाणिस्तानातून लाहोर आणि पंजाबच्या इतर शहरांमध्ये तोरखाम सीमेवरून कांदा आणि टोमॅटो येतात, मात्र अपुरा पुरवठा झाल्यामुळे पाकिस्तान सरकार आता भारतातून आयात करण्याची तयारी करत आहे, ती बाघा सीमेवरून केली जाणार आहे. लाहोर बाजार समितीचे सचिव शहजाद चीमा यांनी सांगितले की, तोरखाम सीमेवरून दररोज 100 कंटेनर टोमॅटो आणि 30 कंटेनर कांद्याची खरेदी केली जाते. यातील दोन टोमॅटो आणि एक कांदा लाहोर शहरात पाठवला जातो, जो मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा आहे.
पाकिस्तान सध्या अफगाणिस्तानमधून कांदा-टोमॅटो आयात करत आहे, जे त्याच्या वापरापेक्षा खूपच कमी आहे. पाकिस्तानकडेही इराणमधून भाजीपाला आयात करण्याचा पर्याय आहे, मात्र हे काम ताफ्तान सीमेवरून करावे लागणार असून इराण सरकारने आयात-निर्यात कर वाढवला आहे. म्हणजेच आधीच भीषण महागाईने त्रस्त असलेल्या पाकिस्तानला येथून आयात करणे महाग होणार आहे. अशा स्थितीत भारत हा त्याच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे दिसते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे.