जिनिव्हा - भारताने काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान काश्मीर प्रश्नाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काश्मिरप्रश्नावरून त्याला वारंवार नामुष्की झेलावी लागत आहे. आता संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे. काश्मीरमधील कथित मानवाधिकारांच्या उल्लंघनावरून भारताविरोधात प्रस्ताव आणण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. जिनेव्हा येथे सुरू असलेल्या 42 व्या मानवाधिकार सेशनमध्ये पाकिस्तानला भारताविरोधात प्रस्ताव आणण्यासाठी अन्य देशांचा आवश्यक प्रमाणात पाठिंबा मिळाला नाही. भारताच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मोठा विजय आहे. दरम्यान, काश्मीरमधून कलम 370 हटवणे ही आपली अंतर्गत बाब असे भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर पाकिस्ताने गुरुवारी रात्री भारताविरोधात दाखल केलेल्या मानवाधिकार हननाच्या प्रस्तावाला पुरेसे समर्थन मिळू शकले नाही. अगदी मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनकडूनही पाकिस्तानला पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आणि काश्मीर प्रश्न हा आपला अंतर्गत प्रश्न असल्याच्या करण्यात येत असलेल्या दाव्याचा मोठा विजय मानला जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये एकूण 47 देशांनी सहभाग घेतला आहे. या परिषदेत भारतही आपली बाजू भक्कमपणे मांडत आहे. या परिषदेत भारतीय पथकाचे नेतृत्व अजय बिसारिया करत आहेत. बिसारिया यांनी पाकिस्तानमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून सुद्धा काम पाहिले आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत भारताविरोधात प्रस्ताव आणण्यात अपयश आल्याने काश्मीर प्रश्नावरून आंतरराष्ट्रीय समुदायाचा आपल्याला पाठिंबा असल्याचा पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेला दावा खोटा ठरला आहे.
UNHRC मध्ये पाकिस्तान पुन्हा तोंडघशी, काश्मीरबाबत प्रस्ताव पारित करण्यात आले अपयश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 12:13 PM