नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधून कलम ३६० रद्द करण्यात आल्यानंतर वारंवार भारताला लक्ष्य करणारा पाकिस्तान सध्या मेटाकुटीला आला आहे. केंद्र सरकारनं कलम ३७० रद्द करताच पाकिस्ताननंभारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले. मात्र आता पाकिस्तान वाळवंटी टोळांमुळे अडचणीत सापडला आहे. आधीच महागाई गगनाला भिडल्यानं संकटात सापडलेल्या पाकिस्तानची टोळधाडीमुळे दमछाक होत आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी पाकिस्तान भारताकडून कीटकनाशकं खरेदी करण्याच्या विचारात आहे. भारताविरोधात सातत्यानं विधानं करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्त्वाखाली उद्या कॅबिनेटची बैठक होणार आहे. यामध्ये भारताकडून कीटकनाशकं खरेदी करण्याचा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. टोळधाडीनं हैराण झालेल्या पाकिस्तानात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली आहे. पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतातल्या पिकांचा फडशा पाडल्यानंतर आता टोळ पंजाब प्रांताकडे सरकले आहेत. टोळधाडीचा सामना करण्यासाठी पाकिस्तानला ७.३ अब्ज पाकिस्तानी रुपयांची आवश्यकता आहे. पाकिस्तानातल्या तब्बल ९ लाख हेक्टर जमिनीवर टोळांची दहशत पाहायला मिळत आहे. टोळधाडीत ४० टक्के पीक नष्ट झाल्याची माहिती सिंध प्रांतातले शेतकरी नेते जाहीद भुरगौरी यांनी सांगितलं. यामध्ये गहू, कापूस, टोमॅटोचा समावेश आहे. यामुळे पाकिस्तानातली महागाई आणखी वाढली आहे. या संकटाशी दोन हात करण्यासाठी आता पाकिस्तान भारताची मदत हवी आहे. टोळधाडींचा फटका राजस्थान, गुजरात आणि पंजाबमधल्या अनेक जिल्ह्यांनादेखील बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांना टोळधाडींचा सामना करावा लागत आहे. या संकटावर मात करण्यासाठी गेल्या दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत पाच बैठका झाल्या आहेत. हे बैठकसत्र पुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे. येत्या जूनमध्येदेखील मोठ्या प्रमाणात टोळधाड येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी गुजरात, राजस्थानातल्या काही जिल्ह्यांना टोळधाडीचा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं.
भयंकर संकटामुळे पाकिस्तानात आणीबाणी लागू; भारताकडे मागितला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 2:39 PM