लाहोर : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या चेह-याला काळं फासण्यात आल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री उशीरा पंजाब प्रांतात पक्ष कार्यकर्त्यांच्या संमेलनाला संबोधित करताना ही घटना घडली. शाई फेकणारा व्यक्ती कट्टरतावादी असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला मारहाण केली त्यानंतर आसिफ यांच्या सुरक्षारक्षकांनी त्याला बाहेर नेलं. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. दरम्यान, चेहरा धुवून आसिफ यांनी आपलं भाषण पूर्ण केलं. 'ख्वाजा आसिफ यांच्या पक्षाने संविधानाच्या माध्यमातून पैगंबर मोहम्मद हे इस्लामचे अखेरचे धर्मगुरू आहेत ही मान्यता बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या', असं ताब्यात घेतलेल्या आरोपीने सांगितलं.मी या व्यक्तीला ओळखत नाही. माझ्या विरोधकांनी काही पैसे देवून त्याला शाई फेकायला सांगितलं होतं असं वाटतं, पण मी त्याला माफ करतो आणि पोलिसांना त्याला सोडून देण्याचं आवाहन करतो असं आसिफ म्हणाले. अशा घटनांमुळे माझ्या राजकारणावर कोणताही परिणाम होत नाही, उलट अशा प्रकारामुळे माझ्यासाठी सहानुभूती वाढेल असं आसिफ म्हणाले.दरम्यान, प्राथमिक चौकशीत ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
पाकिस्तान परराष्ट्र मंत्र्यांच्या चेह-याला काळं फासलं, तोंड धुवून पूर्ण केलं भाषण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 12:26 PM