दुबईभारताकडून पाकिस्तानवर पुन्हा एकदा 'सर्जिकल स्ट्राइक' केला जाणार असल्याचा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी केला आहे. याबाबतचे ठोस पुरावेही आपल्याजवळ असल्याचं कुरेशी यांचं म्हणणं आहे.
दुबईत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेने भारताकडून सर्जिकल स्ट्राइक केला जाण्याचा इशारा दिला असल्याचं कुरेशी म्हणाले.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री दोन दिवसांच्या दुबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. "पाकिस्तानवर 'सर्जिकल स्ट्राइक'ची तयारी भारताकडून केली जात असल्याची मोठी माहिती आमच्या गुप्तचर यंत्रणेनी दिली आहे. भारताने आपल्या व्यापारी मित्र देशांकडून या हल्ल्याबाबतची सहमती घेण्यासही सुरुवात केली आहे", असं कुरेशी म्हणाले.
देशांतर्गत मुद्द्यांवरुन जनतेचं लक्ष वळवण्यासाठी या सर्जिकल स्ट्राइकच्या रणनिती आखली गेल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.दरम्यान, गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या इशाऱ्यानुसार पाक लष्कराला हायअलर्ट देण्यात आल्याचे वृत्त पाकिस्तानच्या 'डॉन' या वृत्तपत्राने दिले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हल्ल्याची चर्चापाकिस्तानी माध्यमांमध्ये भारताकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याचं वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून चालवले जात आहे. भारतीय लष्कर प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून सर्जिकल स्ट्राइक करण्याच्या प्रयत्नात असल्याचं वृत्त 'डॉन'ने सुत्र्यांच्या हवाल्यानं दिलं होतं. दरम्यान, भारतीय लष्कराने या सर्व शक्यता पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत.