इस्लामाबाद: तांत्रिक कारणांमुळे भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानात जाऊन पडल्याच्या घटनेमुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात भारताने उच्च स्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan), सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ आणि परराष्ट्र मंत्रालयातसह अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यातच आता पाकिस्तानचे भारतात असलेले माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनीही या घटनेवर भाष्य करताना भीती व्यक्त केली आहे. रशिया आणि युक्रेन संघर्षामुळे भारताला प्रेरणा मिळाली आहे. भारत काहीतरी धोकादायक आणि भयंकर करू पाहत आहे, असा दावा करत पाकिस्तानने याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे, असा सल्ला बासित यांनी दिला आहे.
माजी राजदूत असलेल्या अब्दुल बासित यांनी या घटनेचा संबंध जम्मू-काश्मीरशी जोडला आहे. बासित यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर करत या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. सदर घटना समस्याकारक आहे. २२ फेब्रुवारी १९९४ रोजी भारताच्या संसदेत एक प्रस्ताव मंजूर केला होता, यामध्ये आझाद जम्मू-काश्मीरला परत घ्यायचे आहे, असे म्हटले होते. आता रशियाने युक्रेनवर कारवाई करत दोनेत्स्क आणि लुहांस्क या दोन प्रांतांना स्वतंत्र घोषित केले आहे. त्यामुळे आता भारताला यातून प्रेरणा मिळाली असू शकते, असे बासित यांनी सांगितले.
रशियाच्या कारवाईला भारताची मूक संमती
संयुक्त राष्ट्रांमध्ये रशियाविरोधात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर भारताने तटस्थ भूमिका घेतली. मतदानापासून स्वतःला दूर ठेवले. रशियाच्या युक्रेनवरील कारवाईला भारताची मूक संमती आहे, असा याचा अर्थ घ्यायचा का, असा सवाल उपस्थित करत भारत स्वतःसाठी कायद्याचा मार्ग तयार करत आहे. आझाद जम्मू-काश्मीरवर हल्ला करून तो भूभाग परत घेण्याची शक्यता अधिक वाढली आहे. या सर्व गोष्टी समोर आल्या पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पाकिस्तानने गाफील राहू नये
भारताच्या नरेंद्र मोदी सरकारची वृत्ती पाहता या घटनेनंतर आता पाकिस्तानने गाफील न राहता सतर्क, सावध राहण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात पाकिस्तान आणि भारताने एक करार करायला हवा, असे बासित यांनी सांगितले. पाकिस्तान त्यांच्या परीक्षणावेळी आगाऊ सूचना देत असतो. मात्र, भारत या कृतीतून पाकिस्तानची भूमिका आजमावून पाहत आहे. याचे कारण भारत शीतयुद्ध सुरू करू पाहत आहे. यासाठी पाकिस्तान फौजांनी सावध राहण्याची गरज असल्याचे बासित म्हणाले.
दरम्यान, ०९ मार्च २०२२ रोजी भारताने आमच्या हवाई सीमेचे उल्लंघन केले असून, एक सुपरसॉनिक ऑब्जेक्ट पाकिस्तानात पडले. यामुळे पाकिस्तानमधील अनेक इमारतींचे नुकसान झाले असून, यात जीवितहानी होऊ शकली असती, असे पाकिस्तानच्या निवेदनात म्हटले आहे. यावर, नियमित तपासणी करताना झालेल्या तांत्रिक चुकीमुळे एक क्षेपणास्त्र डागले गेले आणि ते पाकिस्तानात जाऊ पडले, असे स्पष्टीकरण भारताने दिले आहे.