इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे हाेरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने माेठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्राेल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घाेषणा केली. दरम्यान, अमेरिकेच्या दबावानंतरही रशियाकडून कच्च तेल खरेदी करण्याच्या निर्णयाची पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रशंसा केली. भारतात स्वतंत्र परराष्ट्र धोरणामुळे हे शक्य झालं असल्याचं म्हटलं. याशिवाय त्यांनी पाकिस्तान मुस्लिम लीगच्या (एन) नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार निशाणाही साधला. त्यांनी पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचं कौतुकही केलं.
इम्रान खान यांनी यासंदर्भात एक ट्वीटही केलं. “क्वाडचा भाग असूनही, भारताने अमेरिकेच्या दबावापासून स्वतःला वेगळं ठेवलं आणि जनतेला दिलासा देण्यासाठी रशियाकडून इंधन खरेदी केलं. स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या मदतीनं आमचं सरकार जे साध्य करण्यासाठी काम करत होते ते भारतानं केलं,” असं इम्रान खान यांनी नमूद केलं.
गेल्या काही महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सर्वकालीन उच्चांकी पातळीवर आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ११० डाॅलर्स प्रति बॅरलवर पाेहाेचले आहे. तर दुसरीकडे घरगुती गॅसच्या किमतीही देशभरात १ हजार रुपये प्रति सिलिंडरवर गेल्या आहेत. याशिवाय सरकारने सीएनजीच्या किमतीमध्येही वर्षभरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे महागाई प्रचंड वाढली असून सर्वसामान्य जनतेचं बजेट पूर्णपणे काेलमडलं हाेतं.