इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेतून बेदखल करण्यात आले. यामुळे इम्रान खान देशातील प्रत्येकाकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी रॅलीवर रॅली घेण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या शहरांमध्ये सतत सभा घेण्याचा सपाटा सुरु केला आहे. यातच ते शरीफ घराण्यावर देशाला लुटल्याचे आरोप करत आहेत. असे असताना शुक्रवारी अचानक ते नव्या कोऱ्या हेलिकॉप्टरमधून उतरल्याने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.
इम्रान खान हे पंतप्रधान असताना सरकारी निवासस्थानात न राहता आपल्या १५ किमी लांब पॉश निवासस्थानी राहत होते. यासाठी ते हेलिकॉप्टरचा वापर करायचे. पाकिस्तान भिकेला लागलेला असताना इम्रान यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या मंत्र्यांच्या पॉश गाड्या विकायला काढल्या होत्या. मात्र, आता पंतप्रधान पद जाताच महिनाभरात त्यांनी नवे कोरे हेलिकॉप्टर घेतल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे.
पाकिस्तानी नागरिकांनी, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इम्रानना हे हेलिकॉप्टर कुठून आले, असा सवाल विचारण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी इम्रान मुल्तानला नव्या कोऱ्या हेलिकॉप्टरमधून पोहोचले आणि नवा वाद सुरु झाला. यावर इम्रान गप्प असले तरी, पाकिस्तानी पत्रकार असद अली तूर यांनी मोठा दावा केला आहे. इम्रान खानकडे हे हेलिकॉप्टर कुठून आले, याची खूप चौकशी केल्यावर काही कागदपत्र आणि माहिती हाती लागली आहे. हे चॉपर फराह गोगी उर्फ फराह शहजादीने गिफ्ट केले आहे. दुबईच्या बँकेतून या हेलिकॉप्टरसाठी पैसे वळते करण्यात आले आहेत, असा दावा करण्यात आला आहे.
फराह आणि इम्रान खान यांची रहस्यमयी पत्नी बुशरा बीबी या मैत्रिणी आहेत. फराहने अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रकल्प आदींमधून भरपूर माया गोळा केली आहे. इम्रान यांची सत्ता जाणार हे समजताच ती गुपचूप पाकिस्तान सोडून पळाली आहे. इम्रान सत्तेत आल्यावर फराहने मोठे गैरव्यवहार केले आहेत.