ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 25 - दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरसहित 5100 संशयित दहशतवाद्यांची खाती पाकिस्तान सरकारकडून गोठवण्यात आली आहेत. दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक वृत्तवाहिन्यांनी यासंबंधी वृत्त दिलं आहे.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार या खात्यांमध्ये तब्बल 40 कोटी रक्कम होती. कारवाई करण्यात आलेल्यांमधील 1200 जणांची खाती स्टेट बँक ऑफ पाकिस्तानकडून गोठवण्यात आली असून कोणताही व्यवहार करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या सर्वांची नावं दहशतवाद विरोधी कायद्यात 'ए' विभागात टाकण्यात आली होती अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे.
मसूद अजहरचं नावदेखील 'ए' विभागात टाकण्यात आल्याचं अधिका-यांनी सांगितली असल्याची माहिती द न्यूजने दिली आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारने मसूद अजहरला प्रतिबंधात्मक कोठडीत ठेवल्याचंही अधिका-यांनी सांगितलं आहे.
अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानंतर संशयित दहशतवाद्यांची खाती गोठवण्याची कारवाई करण्यात आल्याचं अधिका-यांनी सांगितलं आहे.