Pakistan Imran Khan Arrest: पाकिस्तानच्या राजकारणात सध्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढत आहेत. त्यांना अटक करण्यासाठी आज पोलीस त्यांच्या घरी पोहोचले. मात्र समर्थकांनी मोठा जमाव जमवून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हे सर्वजण लाठ्या-काठ्या घेऊन पोलिसांसमोर उभे ठाकले आहेत. तोशाखाना प्रकरणात एका महिला न्यायाधीशांना धमकावल्याबद्दल आणि कोर्टात हजर न राहिल्याबद्दल इम्रान खानविरोधात दोन अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याच्यावर अनेक दिवसांपासून अटकेची टांगती तलवार आहे. काल इस्लामाबाद पोलीस हेलिकॉप्टरमधून इम्रानना अटक करण्यासाठी पोहोचले होते. पण अत्यंत हुशारीने इम्रान यांनी घर सोडले आणि थेट रॅलीला संबोधित करण्यासाठी गेले. त्यामुळे समर्थकांच्या गर्दीत माजी पंतप्रधानांना पकडणे पोलिसांना अवघड झाले होते.
त्यानंतर, आता मंगळवारी पुन्हा पोलीस त्याच प्रयत्नात आहेत. इम्रानला काहीही करून अटक करायची असा पोलिसांचा मानस होता. मात्र समर्थकांनी पोलिसांचा मार्ग अडवला आहे. अनेक तरुण हातात काठ्या घेऊन आपल्या नेत्याच्या संरक्षणात उभे राहिले आहेत. या समर्थनावर मरियम नवाज शरीफ यांनी म्हटले आहे की, जर कोणी पोलीस जखमी झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी इम्रान खान यांची असेल. यावेळी पोलीस आणि समर्थक दोघेही समोरासमोर उभे आहेत. मोठा हिंसाचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काही समर्थकांच्या प्रकरणाबाबत बोलताना माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी इस्लामाबाद येथील जिल्हा न्यायालयाच्या सत्र न्यायाधीश झेबा चौधरी यांना धमकी दिली असल्याचे प्रकरण आहे. इम्रान खान यांनी महिला न्यायाधीश जेबा चौधरी यांना धमकीच्या स्वरात भेटण्यास सांगितले असल्याचा आरोप करण्यात आला.