नवी दिल्ली: पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाला माहिती देताना निवडणूक आयोगाने (ECP) सांगितले की, देशात ११ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पाकिस्तान निवडणूक आयोगाचे वकील सजील स्वाती यांनी सांगितले की, मतदारसंघांची निश्चिती २९ जानेवारीपर्यंत पूर्ण होईल.
नॅशनल असेंब्ली आणि प्रांतीय विधानसभा विसर्जित केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ९० दिवसांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. देशातील राजकीय विश्लेषकांनीही गेल्या जानेवारीत होणाऱ्या निवडणुकांमध्ये संभाव्य विलंबाबाबत चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी असे म्हटले आहे की, कोणताही राजकीय पक्ष निवडणूक मोडमध्ये दिसत नाही, तर काहींनी असा इशारा दिला आहे की कडाक्याच्या थंडीमुळे मतदान प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो.
एप्रिल २०२२मध्ये नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्तावाद्वारे इम्रान खान सरकारची हकालपट्टी झाल्यानंतर मोठ्या आर्थिक संकटाच्या दरम्यान पाकिस्तान राजकीय अनिश्चिततेच्या गर्तेत आहे. अलीकडेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रपती अल्वी म्हणाले होते की, त्यांना जानेवारीत निवडणुका होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. यासाठी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यासह अनेक प्रयत्न करण्यात आले. ईसीपीने यापूर्वी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका होतील असे सांगितले होते. परंतु राजकीय पक्षांच्या मागणीनंतरही त्यांनी अचूक तारीख देण्यास नकार दिला होता.