इस्लामाबाद: हिंदी महासागरात भारताला घेरण्याच्या तयारीत असलेल्या चीननंपाकिस्तानची ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून चीनकडूनपाकिस्तानला अत्याधुनिक शस्त्रसामग्री पुरवली जात आहे. चीननं आता पाकिस्तानला पहिली टाईप-०५४ स्टिल्थ युद्धनौका सोपवली आहे. ही युद्धनौका कोणत्याही रडारला अगदी सहज चकवा देऊ शकते. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.
टाईप-०५४ स्टिल्थ युद्धनौका अत्याधुनिक आहे. युद्धनौकेतून लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं डागली जाऊ शकतात. एका मिनिटात अनेक राऊंड्स फायर करणारी अत्याधुनिक तोफ युद्धनौकेवर लावण्यात आली आहे. या युद्धनौकेसाठी पाकिस्तान आणि चीनमध्ये २०१७ मध्ये करार झाला होता. या कराराच्या अंतर्गत पहिली युद्धनौका गेल्या ऑगस्टमध्ये तयार झाली. त्यानंतर जवळपास १ वर्षभर तिची समुद्रात चाचणी झाली.
चीननं तयार केलेल्या टाईप-०५४ स्टिल्थ युद्धनौकेतून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतो. त्यामुळे ती सहज शोधून काढता येऊ शकते, अशी माहिती काही वृत्तांमधून समोर आली. त्यानंतर चीननं या युद्धनौकेत बऱ्याच सुधारणा केल्या. टाईप-०५४ स्टिल्थ युद्धनौका चिनी नौदलाच्या प्रमुख आधार आहेत. अशा प्रकारच्या किमान ३० युद्धनौका चिनी नौदलाकडे आहेत. शांघायमधल्या हुडोंग झोंगहुआ शिपयार्डमध्ये युद्धनौकेची बांधणी करण्यात आली आहे.
टाईप-०५४ स्टिल्थ युद्धनौकेवर अत्याधुनिक हत्यारं आहेत. जमीन आणि आकाशातील निगराणीसाठीची उपकरणं आणि सेन्सर्स नौकेवर आहेत. याशिवाय अत्याधुनिक युद्ध व्यवस्थापन यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे पाकिस्तानच्या नौदलाची क्षमता कितीतरी पटीनं वाढणार आहे. पाकिस्तानच्या सागरी सुरक्षेत आणि प्रतिहल्ला करण्याच्या क्षमतेतही यामुळे वाढ होईल.