नवी दिल्ली - पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्या वर्षी पाकिस्ताननं यूएनमध्ये भारताला घेरण्यासाठी पॅलेस्टाईनमधील फोटो दाखवत, संबंधित फोटो काश्मीरमध्ये भारताकडून होणाऱ्या अत्याचाराचा पुरावा असल्याचा कांगावा केला होता. यानंतर भारतानं पाकिस्तानचा खोटारडा चेहरा जगासमोर आणला. पाकिस्तान पुन्हा तिच चूक करत आहे. कहर म्हणजे यावेळेस स्वतःकडूनच पसरवला जाणार दहशतवाद भारताचा असल्याच्या उलट्या बोंबा पाकिस्तानकडून मारल्या जात आहेत.
'जम्मू काश्मीरमध्ये भारताकडून होणार अत्याचार' या शीर्षकांतर्गत 20,000 पानांचे 20 पोस्टल स्टॅम्प पाकिस्तानकडून छापण्यात आले आहेत. या स्टॅम्पमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन कमांडर बुरहान वानीचाही समावेश आहे. संतापजनक बाब म्हणजे पाकिस्ताननं त्याला शहीद असे म्हटलं आहे. पण हा कांगावा करताना पाकिस्ताननं मोठी चूक केली आहे. काश्मिरी पंडित आणि शीखांवर पाकिस्ताननं केलेले हल्ले भारताकडून करण्यात आल्याचा खोटा दावा केला आहे. मात्र सत्य जगजाहीर आहे. आपली दहशतवादी कृत्ये भारताच्या माथी मारण्याचा पाकिस्तानचा डाव फसला आहे.
काश्मीरमधील एका संघटनेनं यूएन सेक्रेटरी जनरलसोबत पत्रव्यवहार करत अशाच एका स्टॅम्पबाबतचे सत्य उघड केले. या स्टॅम्पमध्ये पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांमधील भारतीय पीडितांचे फोटो आहेत. यूएनमध्ये तक्रार करणाऱ्या संघटनेनं लिहिले आहे की, 'आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. केवळ आमचे अस्तित्व राखण्याचीच नाही तर पाकिस्तान समर्थित दहशतावादाचा प्रभाव रोखण्याचीही जबाबादारी तुमच्यावर आहे. शिवाय, पाकिस्तानकडून जारी करण्यात आलेले हे स्टॅम्प मागे घेण्यात यावेत.'
पाकिस्तानी मीडियानुसार, हे स्टॅम्प छापण्याची कल्पना कोणाची होती, याबाबत ठोस अशी माहिती नाही. मात्र या प्रस्तावाला सुरुवातीला माहिती व प्रसारण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि पीएमओकडून मंजुरी देण्यात आली होती.