इस्लामाबाद : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील देशांकडून कोरोना लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. भारतातही १६ जानेवारीपासून देशव्यापी कोरोना लसीकरण अभियानाला सुरुवात करण्यात आली. यानंतर आता कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तान सरकारनेही एक पाऊल पुढे टाकले आहे. ऑक्सफोर्ड एक्स्ट्राजेनका कोरोना लसीचा आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष आरोग्य सहाय्यक डॉ. फैसल सुल्तान यांनी यासंदर्भातील माहितीला दुजोरा दिला आहे. पाकिस्तान औषध नियामक प्राधिकरणाने संपूर्ण देशात ऑक्सफोर्ड एक्स्ट्राजेनका कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. आगामी तीन महिन्यात ही लस उपलब्ध होईल, असा विश्वास डॉ. फैसल सुल्तान यांनी यावेळी व्यक्त केला.
असद उमर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये मार्च महिन्यापासून लसीकरणाला सुरुवात केली जाईल. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्वप्रथम लस देण्यात येणार आहे. सर्वप्रथम ब्रिटनकडून ऑक्सफोर्ड एक्स्ट्राजेनका कोरोना लसीला मंजुरी देण्यात आली होती. ऑक्सफोर्ड एक्स्ट्राजेनका कोरोना लस किफायतशीर आणि वापरायला सोपी असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसींना भारताने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरण अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. भारतात पहिल्या टप्प्यात तीन कोटी, तर दुसऱ्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना कोरोना लस देण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचे सांगितले जात आहे.