नवी दिल्ली - संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमाला देशभरात करणी सेनेकडून तीव्र विरोध केला जात आहे. विरोधाच्या नावाखाली ठिकठिकाणी जाळपोळ व तोडफोड करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, शेजारील देश पाकिस्तानानं 'पद्मावत' सिनेमाला यू सर्टिफिकेट देत सिनेमाच्या प्रदर्शनाला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे भन्साळींचा पद्मावत पाकिस्तानातील सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे. आपल्या सेन्सॉन बोर्डनं सिनेमाला यू-ए सर्टिफिकेट दिलंय तर पाकिस्तानानं पद्मावतला यू सर्टिफिकेट दिले आहे.
एकीकडे पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदीची मागणी करण्यात येत असताना दुसरीकडे पाकिस्तानात सिनेमाच्या प्रदर्शनात कोणताही अडथळा आलेला नाही. भारतात 'पद्मावत' सिनेमातील व्यक्तीरेखा, गाणी, पेहराव, वेशभूषा या सर्वच गोष्टींवर आक्षेप नोंदवण्यात आला होता. सेन्सॉर बोर्डानं काही सूचना सुचवल्यानंतर सिनेमाच्या प्रदर्शनाला ग्रीन सिग्नल दिला होता.
सिनेमातील 'घुमर' गाण्यामध्ये दीपिकाची कंबर दिसत असल्यानं यावरही आक्षेप नोंदवण्यात आला होता. इतिहासात छेडछाड केल्याचा आरोप करणी सेनेकडून करण्यात आला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यास राजपूतांच्या भावना दुखावल्या जातील, असे करणी सेनेनं म्हटले होते. या पार्श्वभूमीवर करणी सेनेने सिनेमाच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शनं करत जाळपोळ, तोडफोड केली. बुधवारी गुरुग्राम येथे शाळेच्या बसवरदेखील हल्ला केला होता. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी बसमध्ये विद्यार्थी व शाळेतील कर्मचारी होते.