ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि.27- पाकिस्तानातील रेल्वे अधिका-यांनी सोमवारी चार भारतीय महिलांना नवी दिल्लीला जाणा-या समझोता एक्स्प्रेसने प्रवास करण्यापासून रोखलं. कागदपत्रांची पुर्तता न केल्याने त्या महिलांना समझोता एक्स्प्रेसमध्ये जाण्यास परवानगी देण्यात आली नाही असं सांगण्यात येत आहे.
महिलांनी वाघा रेल्वे स्थानकावर पाकिस्तानातील रेल्वे अधिका-यांविरोधात निदर्शनं केली. अनेकदा आम्ही रेल्वे अधिका-यांना विनवणी केली, आमचे नातेवाईक भारतात आमची वाट पाहत आहेत असं एका महिलेने सांगितलं. सोमवार आणि गुरूवारी नवी दिल्ली आणि लाहोरदरम्यान समझोता एक्सप्रेस चालवण्यात येते. कागदपत्रांची पुर्तता करून त्या महिला गुरूवारी भारतात जाऊ शकतात असं रेल्वेच्या एका अधिका-याने सांगितलं.
100 पेक्षा जास्त पाकिस्तानी आणि 84 भारतीय नागरिकांना घेऊन समझोता एक्स्प्रेस चोख सुरक्षा व्यवस्थेत नवी दिल्लीसाठी रवाना झाली.