इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. तोशाखाना प्रकरणात दोघांनाही १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानच्या जिओ न्यूजच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये या दोघांनाही तुरुंगवास आणि सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याचबरोबर, न्यायालयाने इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना १० वर्षांसाठी सार्वजनिक पदावर राहण्यास बंदी घातली आहे. तसेच, या दोघांना ७८. ७० कोटी पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, इम्रान खान यांना सलग दोन दिवसांत हा दुसरा धक्का आहे. कारण, मंगळवारी पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने इम्रान खान आणि पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद यांना सायफर प्रकरणात १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड होण्याच्या काही महिन्यांपूर्वी इम्रान खान यांनी 2018 मध्ये बुशरा बीबी यांच्याशी लग्न केले. या प्रकरणाच्या संपूर्ण सुनावणीदरम्यान बुशरा बीबी पोलीस कोठडीत होत्या.
सायफर प्रकरणात १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षागोपनीय डिप्लोमॅटिक केबल्स (सायफर) लीक करणे आणि गुप्तता कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी या दोघांना १० वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने मंगळवारी या संदर्भातील निर्णय दिला. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांना दोषी ठरवण्यात आले होते. हे प्रकरण एका डिप्लोमॅटिक दस्तऐवजाशी संबंधित असून ते दस्तऐवज इम्रान खान यांच्याकडून कथितपणे गायब झाले होते.
काय आहे तोशाखाना प्रकरण?तोशाखाना हा मंत्रिमंडळाचा एक विभाग आहे, जिथे राष्ट्रप्रमुख आणि किंवा सर्वोच्च नेते इतर देशांच्या परदेशी पाहुण्यांनी दिलेल्या मौल्यवान भेटवस्तू ठेवतात. नियमानुसार इतर देशांच्या प्रमुखांकडून किंवा मान्यवरांकडून मिळालेल्या भेटवस्तू तोशाखान्यात ठेवणे आवश्यक असते. २०१८ मध्ये इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. अरब देशांच्या दौऱ्यांमध्ये त्यांना तेथील राज्यकर्त्यांकडून महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्यांना अनेक युरोपीय देशांच्या राष्ट्रप्रमुखांकडूनही मौल्यवान भेटवस्तू मिळाल्या. या भेटवस्तू इम्रान खान यांनी स्वस्तात विकत घेतल्या आणि मोठ्या नफ्यात विकल्या. त्यांच्या सरकारने या संपूर्ण प्रक्रियेला कायदेशीर परवानगी दिली होती.
सायफर केस म्हणजे काय?इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांच्याविरुद्धचा हा सायफरचा (Cipher) खटला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. इम्रान खान यांच्यावर सर्वोच्च गुप्त माहितीचा वैयक्तिक वापर केल्याचा आरोप आहे. सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर इम्रान यांनी आपल्या हकालपट्टीमागे अमेरिका हात असल्याचा आरोप केला होता. यासाठी वॉशिंग्टनमधील पाकिस्तानी दूतावासाने त्यांना एक केबल (टेप किंवा गुप्त माहिती) पाठवल्याचे इम्रानने सांगितले. इम्रान खान यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी वादग्रस्त मुत्सद्दी संभाषण सार्वजनिक केले होते. त्याला सायफर असे म्हणतात.