पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी भारतावर तोंडसुख घ्यायची संधी सोडली नाही. पंतप्रधान पदाची खूर्ची धोक्यात असताना पुन्हा त्यांनी भारतविरोधी आग ओकण्यास सुरुवात केली. एका रॅलीमध्ये त्यांनी भारताकडून तांत्रिक चुकीमुळे फायर झालेल्या मिसाईलवर भाष्य केले आहे.
भारताची मिसाईल पाकिस्तानात पडली तेव्हा आम्ही देखील त्याचे प्रत्यूत्तर देऊ शकत होतो, परंतू आम्ही संयम ठेवला, अशी शेखी त्यांनी मिरविली आहे. ९ मार्चला हा अपघात झाला होता. भारताचे एक सुपरसॉनिक मिसाईल त्यावर शस्त्रे लादलेली नव्हती, ते देखभाल करताना चुकीने फायर झाले होते. ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पडले होते. लाहोरपासून २७५ किमी दूरवर हे मिसाईल एका कोल्ड स्टोरेजवर कोसळले होते. यामध्ये जिवीतहाणी झाली नाही.
या घटनेनंतर इम्रान खान गप्पच होते. परंतू आता त्यांच्यावर त्यांच्याच मित्रपक्षांनी आणि विरोधकांनी मिळून अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यामुळे इम्रान खान पुन्हा रॅली करू लागले आहेत. पाकिस्तानी पंजाबच्या हफिजाबादमध्ये रविवारी त्यांची सभा होती. तेव्हा त्यांनी देशाच्या सुरक्षेवर हे वक्तव्य केले. आपल्याला देशाचे संरक्षण क्षेत्र आणि देशाला मजबूत बनवायचे आहे, असे ते म्हणाले.
त्याआधी पाकिस्ताननं या प्रकरणी संयुक्त चौकशीची मागणी केली आहे. आमच्या हद्दीत कोसळलेलं क्षेपणास्त्र कोणतं होतं, त्यात कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता, असे प्रश्न पाकिस्तानकडून उपस्थित करण्यात आले आहेत. पाकिस्तानने भारताला सुरक्षेचे प्रोटोकॉल आणि तांत्रिक सुरक्षेचे उपाय यावरून पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानं सुनावलं आहे. क्षेपणास्त्र दुसऱ्या देशाच्या हद्दीत कोसळणं गंभीर बाब आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेलं स्पष्टीकरण पुरेसं नाही, असं पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रकरणी पाकिस्ताननं भारतावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. दोन्ही देशांकडे अण्वस्त्रं आहेत. भारताचं क्षेपणास्त्र पडल्यावर आम्ही प्रत्युत्तरादाखल कारवाई केली असती तर काय झालं असतं, असा सवाल पाकिस्ताननं विचारला होता.