इस्लामाबाद:पाकिस्तानातील राजकीय संकट अधिकच गडद होत चालले आहे. पाठिंबा गमावलेले इम्रान खान(Pakistan PM Imran Khan) कधीही पंतप्रधानपदाचा राजीनामा(Resignation) देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण, सरकारमधील मंत्र्यांनी या शक्यतांचे खंडन केले आहे. राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचा दावा पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी केला आहे.
'इम्रान अखेरच्या चेंडूपर्यंत खेळतील...'इम्रान खान यांच्या राजीनाम्याविषीय बोलताना शेख रशीद म्हणाले की, 'इम्रान खान राजीनामा देणार नाहीत. ते अखेरच्या बॉलपर्यंत खेळत राहतील.' दरम्यान, इम्रान खान यांच्या राजकीय भवितव्याबद्दल आज निर्णय होऊ शकतो. कारण, आज संध्याकाळी इम्रान खान देशाला संबोधित करणार आहेत. यादरम्यान, ते अतिशय महत्वाची माहिती देऊ शकतात. तिकडे, इम्रान सरकारमधील अजून एक मंत्री फवाद चौधरी यांनीही दावा केला आहे की, 'इम्रान खान यांची सत्ता पाडण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. काहीही झाले तरीदेखील इम्रान खान राजीनामा देणार नाहीत.
इम्रान सरकारमधील मंत्र्यांचा राजीनामापाकिस्तानात इम्रान खान आघाडी सरकारचे नेतृत्व करत आहेत. दरम्यान, कायदा मंत्री फारुख नसीम आणि आयटी मंत्री अमिनुल हक यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. दोन्ही नेते इम्रान सरकारचा मित्रपक्ष असलेल्या एमक्यूएमचे सदस्य आहेत. दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अनेक नेत्यांनी पाठिंबा काढला
25 मार्च रोजी विरोधी पक्षांनी खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. पाकिस्तानच्या 342 सदस्यांच्या नॅशनल असेंब्लीमध्ये खान यांच्या पक्षाचे 155 सदस्य आहेत आणि त्यांना सत्तेत राहण्यासाठी किमान 172 खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. इम्रान खान यांच्या पक्षाचे सुमारे 24 खासदार बंडखोर झाले आहेत. याशिवाय सरकारमधील मित्रपक्ष, एमक्यूएमपी, पीएमएलक्यू आणि जमहूरी वतन पक्षाने एका मागोमाग एक पाठिंबा काढला आहे. जम्हूरी वतन पक्षाचे पहिले नेते शाहजैन बुगती यांनी इम्रान मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे.