कराची: पाकिस्तानमध्ये मोठा राजकीय भूकंप आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची सत्ता धोक्यात असून, त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. ज्या पाकिस्तानी लष्कराने इम्रान खान सत्तेत आल्यावर त्यांना पाठिंबा दिला होता, तेच आता त्यांच्या विरोधात जाताना दिसत आहेत. रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांनी काल इम्रान खान यांची भेट घेतली आणि या बैठकीनंतर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इम्रानची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
इम्रानसमोर चार मोठी आव्हानेतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, इम्रान खान यांच्यासमोर बहुमत सिद्ध करणे फार कठीण काम असेल, कारण इम्रान खानसमोर चार आव्हाने आहेत. पहिले आव्हान म्हणजे सर्व पक्ष, मग तो पीपीपी असो वा पीएमएल-एन, या सर्वांनी एकत्र येऊन अविश्वास प्रस्ताव आणला आहे. दुसरे मोठे आव्हान म्हणजे, त्यांचे मित्रपक्ष स्वतः इम्रान खानची बाजू सोडताना दिसत आहेत. तिसरे आव्हान हे आहे की, त्यांच्याच पक्षाने घोषित केलेल्या नॅशनल असेंब्लीच्या 13 सदस्यांनी इम्रान खानला सोडून सिंध हाऊसमध्ये आश्रय घेतला आहे. आणि चौथे आव्हान म्हणजे इम्रान खान यांच्या पाठीशी उभी असलेली सेना आता त्यांच्यासोबत नाही.
नागरिकांच्या मनात सरकारविरोधात नाराजीया आव्हानांच्या पार्श्वभूमीवर इम्रान खानसमोर सर्वात मोठे आव्हान 172चा आकडा पार करण्याचे असेल. पीटीआयचे 155 खासदार आहेत. तर, अपक्ष म्हणून विजयी झाल्यानंतर जो कोणी येईल, त्याला कोणत्या ना कोणत्या पक्षात सामील व्हावेच लागेल, असा पाकिस्तानमध्ये नियम आहे. त्यामुळे असे 5-6 खासदार पीटीआयमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर त्यांची संख्या 160 च्या आसपास होते. याशिवाय पीएमएल-क्यू आणि एमक्यूएम असे 12 खासदार असून त्यांचे एकूण संख्याबळ 178 आहे. पण ज्या प्रकारे महागाई वाढली आणि लोकांचा रोष उफाळून आला, त्यावरून असे बोलले जात आहे की, इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचे 30 ते 40 खासदार मतदारांना नको आहेत.
इम्रान खानवर सैन्य नाराजइम्रान खान यांच्या धोरणांवर जनता खूश नसल्याचे बोलले जात आहे. मग ते आर्थिक असो वा अन्य कोणत्याही प्रकारे. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविरोधातील रोष उघडपणे दिसून येत आहे. तसेच, नागरिकांच्या मनात सैन्याबद्दल नाराजी निर्माण होऊ नये, म्हणून सैन्यही इम्रान खानची साथ सोडताना दिसत आहे. पाकिस्तानमध्ये राजकारणात सैन्याची मोठी भूमिका असते. असे म्हटले जाते की, पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी सैन्याच्या मर्जीतला व्यक्ती बसतो. त्यामुळेच आता सैन्याची नाराजी असल्यामुळे इम्रान खानची खुर्ची धोक्यात आहे.