पाकिस्तान अंधारात; 12-12 तास वीज गायब, एका चुकीच्या धोरणामुळे ओढवली ही परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 03:38 PM2022-06-15T15:38:49+5:302022-06-15T15:39:37+5:30

Pakistan Power Cut: रशिया-युक्रेन युद्ध आणि दहा वर्षांपूर्वी स्वीकारलेल्या एका धोरणामुळे सध्या पाकिस्तानला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

Pakistan in the dark; 12-12 hours power outage, this situation caused by a wrong policy | पाकिस्तान अंधारात; 12-12 तास वीज गायब, एका चुकीच्या धोरणामुळे ओढवली ही परिस्थिती

पाकिस्तान अंधारात; 12-12 तास वीज गायब, एका चुकीच्या धोरणामुळे ओढवली ही परिस्थिती

Next

इस्लामाबाद: रशिया आणि युक्रेन यांच्यातील अनेक महिने चाललेल्या युद्धाचा परिणाम जगभर दिसून येत आहे. युक्रेनवरील हल्ल्यामुळे युरोपने रशियाकडून गॅसची खरेदी कमी केली आहे, त्यामुळे एलएनजीच्या जागतिक किमती गगनाला भिडल्या आहेत. अडचणीतून जात असलेल्या शेजारी देश पाकिस्तानला याचा मोठा फटका बसत आहे. आर्थिक आणि राजकीय संकटातून जात असलेल्या पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये 12 तासांपेक्षा जास्त वीजपुरवठा खंडित केला जात आहे.

जुन्या धोरणामुळे पाकिस्तान अडचणीत
सुमारे दशकभरापूर्वी पाकिस्तानने उर्जेबाबत नवीन दीर्घकालीन धोरण स्वीकारले होते. नवीन धोरणानुसार पाकिस्तानने एलएनजीमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. इटली आणि कतारमधील कंपन्यांना एलएनजी पुरवठा करण्यासाठी दीर्घ मुदतीचे कंत्राट देण्यात आले होते. सध्या जागतिक बाजारपेठेत एलएनजीच्या किमती वाढल्या असल्याने या कंपन्या पाकिस्तानला उपलब्ध असलेला एलएनजी इतरत्र वापरून अधिक नफा कमवत आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानला पॉवर प्लांटपासून खत प्रकल्पापर्यंत एलएनजीचा तुटवडा जाणवत आहे.

नागरिकांचे हाल
पाकिस्तानमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, गेल्या महिन्यात ईदच्या वेळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी, स्पॉट मार्केटमधून सुमारे 100 दशलक्ष डॉलर्समध्ये फक्त एक एलएनजी शिपमेंट खरेदी करावी लागली. परकीय चलनाच्या साठ्यात ऐतिहासिक घसरण होत असताना पाकिस्तानने शिपमेंटसाठी विक्रमी पेमेंट केले. बरेच प्रयत्न करूनही पाकिस्तान एलएनजीचे व्यवस्थापन करू शकत नाही. त्यामुळे वीजनिर्मिती प्रकल्प ठप्प झाले असून पाकिस्तानला 12-12 तासांहून अधिक काळ वीज तोडवी लागत आहे. सध्या पाकिस्तानच्या अनेक भगात उष्णतेची लाट आणि वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत.

वीज बचतीसाठी विचित्र प्रयत्न
वीज बचतीसाठी पाकिस्तानने अलीकडच्या काळात काही आक्रमक पावले उचलली आहेत. सर्वप्रथम सरकारी कर्मचाऱ्यांना शनिवारच्या शिफ्टमधून कार्यमुक्त करण्यात आले. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बजेटमध्येही 50 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. लग्न समारंभांवरही बंदी घालण्यात आली आहे. खतनिर्मिती केंद्राला होणारा एलएनजीचा पुरवठा बंद करून वीज प्रकल्पाला अधिक पुरवठा केला जात आहे. अनेक भागात मोबाईल नेटवर्कही गायब असल्याची परिस्थिती आहे. विजेअभावी टॉवर काम करत नाहीत आणि ऑपरेटर्सकडे जनरेटर चालवण्यासाठी तेलही शिल्लक नाही.

एलएनजीच्या किमती वाढल्या
एलएनजीबद्दल बोलायचे झाले तर गेल्या दोन वर्षांत त्याच्या किमती 1000 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. पहिल्या कोविड महामारीनंतर मागणी वाढल्याने त्याच्या किमती वाढल्या. मग रशिया-युक्रेन युद्धाने त्याचे भाव पेटले. तिसरे कारण म्हणजे युरोपमध्ये एलएनजीचा वाढलेला वापर. युरोपने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मे पर्यंत 50 टक्के जास्त एलएनजी खरेदी केली आहे. रशियाचे गॅसवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी युरोपने एलएनजीची खरेदी वाढवली आहे. या वाढलेल्या मागणीमुळे आणि किमतीमुळे कंपन्यांनी युरोपला एलएनजी विकून अधिक नफा कमावण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Pakistan in the dark; 12-12 hours power outage, this situation caused by a wrong policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.