Bangladesh Crisis : बांगलादेशात शेख हसीना यांनी पंतप्रधान पद सोडल्यानंतर सरकार कोसळलं आहे. आरक्षणाच्या वादावरून सुरू असलेल्या आंदोलनामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना सोमवारी पायउतार व्हावे लागले. रविवारी आंदोलन चिघळल्यानंतर देशभरात हिंसाचार सुरु झाला. त्यानंतर शेख हसीना यांनी देश सोडला. अशातच बांगलादेशमधील आंदोलन पेटण्यामागे चीन आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय यांचा सहभाग असल्याची शंका भारतीय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. बांगलादेशातील सरकार उलथवून टाकण्याबाबत गुप्तचर विभागाच्या अहवालातून याबाबत मोठा खुलासा झाला आहे.
शेख हसीना यांना देश सोडून पळून जाण्यास भाग पाडण्यास आणि बांगलादेशात विध्वंस वाढवण्यात पाकिस्तानची आयएसआय आणि त्यांना आश्रय देणारा चीन असल्याचे म्हटलं जात आहे. पाकिस्तानने हिंसाचार भडकावण्यासाठी छात्रशिविर नावाच्या संघटनेचा वापर केला. ही विद्यार्थी शिबिर संघटना बांगलादेशातील प्रतिबंधित जमात-ए-इस्लामीचा एक भाग आहे. त्याचबरोबर जमात-ए-इस्लामीला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा पाठिंबा आहे. शेख हसीना यांनी जमात-ए-इस्लामी, स्टुडंट युनियन आणि इतर संघटनांवर बंदी घातली होती.
लंडनमध्ये आखली हिंसाचाराची योजना
बांगलादेशी अधिकाऱ्यांकडे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या कार्यवाहक प्रमुख खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान याच्या संगनमताचे पुरावेही आहेत. लंडनमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सहकार्याने बांगलादेशातील हिंसाचाराची योजना तयार करण्यात आली. ब्ल्यू प्रिंट तयार केल्यानंतर बांगलादेशात ही योजना लागू करण्यात आली. सोशल मीडिया हँडल एक्सवर शेख हसीना सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी ५०० हून अधिक पोस्ट देखील करण्यात आल्या आहेत. यामध्ये पाकिस्तानी हँडल्सचाही समावेश आहे. जमात-ए-इस्लामीच्या विद्यार्थी संघटनेला बांगलादेशात हिंसाचार भडकावणे आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे राजकीय आंदोलनात रूपांतर करण्याचे काम दिलं होते.
पाकिस्तान थेट बांगलादेशमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे म्हटलं जात असताना यामागे भारताचा विरोधी चीन असल्याचा दावा केला जातोय.चीन गेल्या काही वर्षांपासून भारताच्या शेजारी असणाऱ्या सहा देशांवर नियंत्रण ठेवत असून, भारतासमोरील अडचणी वाढवत आहे. बांगलादेशातील राजकीय परिस्थिती बिघडली भारतालाही धोका निर्माण झाल्याचे म्हटलं आहे. चीनने भारताच्या आजूबाजूच्या देशांवर नियंत्रण ठेवलं असून जे भारतविरोधी डावपेच आखत असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे. भारतासोबतच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि म्यानमारवर चीनचा प्रभाव वाढत आहे. बांगलादेशात लष्कराच्या पाठिंब्याने सरकार स्थापन झाल्यास चीनशी जवळीक वाढेल आणि तेथील हिंदूंवर हल्लेही वाढतील, असे बोलले जात आहे.