कराचीतील एक व्यक्ती कथितपणे ती व्हॅन घेऊन फरार झाला ज्यात २० कोटी रूपयाची रक्कम होती. पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, व्हॅनचा सुरक्षा गार्ड जेव्हा रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी चुंदरीगड रोडवरील 'स्टेट बॅंक ऑफ पाकिस्तान'च्या इमारतीत गेला तेव्हा सुरक्षा कंपनीत कार्यरत वाहन चालक हुसैन शाह व्हॅन घेऊन फरार झाला.
कॅश ट्रान्झॅक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चुंदरीगड रोड पाकिस्तानचा आर्थिक केंद्र आआहे. जिथे केंद्रीय बॅंक आणि इतर बॅंका आहेत. या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, 'हे एक असामान्य प्रकरण आहे. ही घटना नऊ ऑगस्टला भर दिवसा घडली. आम्ही सर्व बाजूंचा विचार करून प्रकरणाची चौकशी करत आहोत. कारण अशी घटना आधी कधी घडली नाही'.
विशेष तपास अधिकारी तारिक चौधरी म्हणाले की, या केसमध्ये काही ठोस प्रगती झाली नाही आणि चालकालाही अजून अटक करण्यात आलेली नाही. तारिक म्हणाले की, 'सुरक्षा कंपनीच्या एका व्हॅनमध्ये केंद्रीय बॅंकची रक्कम नेण्यात येत होती आणि सुरक्षा गार्ड मुहम्मद सलीमनुसार तो रक्कम हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी बॅंकेच्या आत गेला होता. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा व्हॅन तिथे नव्हती. त्याने चालकाला फोन केला तर तो म्हणाला की, तो थोड्या वेळात परत येईल. कारण त्याला एक महत्वाचं काम आहे'.
त्यांनी सांगितलं की, गार्डने पुन्हा चालकाला फोन केला तर त्याचा फोन बंद येत होता. व्हॅन काही किलोमीटर अंतरावर सापडली आहे. पण त्यातील २० कोटी रूपयांची रक्कम गायब आहे. रकमेसोबतच व्हॅनमधून हत्यार, एक कॅमेरा आणि डीव्हीआरही गायब आहे.