पाकिस्तान काही दिवसांपासून कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना करीत आहे. यातच आता पाकिस्तानातील कराची शहर काल रात्री अंधारात बुडाले होते. शहरात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमधील कराचीमधील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. तांत्रिक बिघाडामुळे हाय टेंशन (एचटी) ट्रान्समिशन केबल ट्रिप झाली, त्यामुळे वीज खंडित करावी लागली.
हाय टेंशन (एचटी) ट्रान्समिशन लाइन ट्रिप झाल्यामुळे कराची शहराचा जवळपास 40 टक्के भाग पूर्णपणे ब्लॅक आऊट झाल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. परिणामी, अनेक ग्रिड स्टेशन्समध्ये ट्रिपिंगही दिसून आले. रिपोर्टनुसार, प्रभावित भागात नुमाईश चौरंगी, सदर, लाइन्स एरिया, डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटी (DHA), पंजाब कॉलनी, गुलिस्तान-ए-जौहर, कोरंगी यांचा समावेश आहे. मात्र, कराचीच्या वीज पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या के-इलेक्ट्रिक या युटिलिटी फर्मने कोणतेही विधान जारी केलेले नाही.
याआधी जानेवारीमध्येही नॅशनल ग्रिडमध्ये फ्रीक्वेंसीमधील चढउतारांमुळे तीव्र वीज खंडित झाली होती. ज्यामुळे कराचीमध्ये बत्तीगुल झाली होती. काल रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नॉर्थ नाझिमाबाद, न्यू कराची, नॉर्थ कराची, लियाकताबाद, क्लिफ्टन, कोरंगी, ओरंगी, गुलशन-ए-इकबाल, सदर, ओल्ड सिटी एरिया, लांधी, गुलशन-ए-जौहर, मलीर, गुलशन-ए- हदीदचे लोक, साइट इंडस्ट्रियल एरिया, पाक कॉलनी, शाह फैसल कॉलनी आणि मॉडेल कॉलनीमधील लोकांना त्रासाला सामोरे जावे लागले. वीज खंडित झाल्यानंतर लोक कराचीच्या रस्त्यांवर भटकताना दिसले. तसेच, मूलभूत गरजांची पूर्तता न झाल्यामुळे बहुतांश लोक नाराज झालेले दिसले.
पाकिस्तानात प्रचंड महागाईमागील कित्येक दिवसांपासून पाकिस्तानची परिस्थिती अतिशय बिकट आहे. महागाईमुळे पाकिस्तानमध्ये अनेक गोष्टी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. गरिबी आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानच्या समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही. तसेच, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्याने प्रचंड बेरोजगारी निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गॅस, खाण्या-पिण्याच्या गोष्टी, पेट्रोल संकटानंतर आता पाकिस्तानवर एकप्रकारे विजेचे संकट ओढावले आहे.