Pakistan Warning Afghanistan over TPP Terrorism: बलुचिस्तानमध्ये तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे १२ जवान शहीद झाल्यानंतर पाकिस्तान आणि तालिबान सरकारमधील शाब्दिक युद्ध अधिकच तीव्र झाल्याचे चित्र आहे. एकीकडे पाकिस्तान सरकारने तालिबानकडून TTP वर कारवाईची मागणी केली आहे, तर दुसरीकडे अफगाणिस्तान सरकारने TTP चे दहशतवादी आपल्या भूमीवर नसल्याचे स्पष्ट केले आहे. जेव्हा पाकिस्तानने तालिबानला दोहा कराराची आठवण करून दिली, तेव्हा अफगाण सरकारने सडेतोड प्रत्युत्तर देत हा करार पाकिस्तानशी नसून अमेरिकेसोबत केला असल्याचे सांगितले आहे. या वाढत्या शाब्दिक युद्धादरम्यान, अफगाणिस्तान मधील TTP चे सुरक्षित आश्रयस्थान उद्ध्वस्त करण्याचा पर्याय आपल्याकडे असल्याचा इशारा पाकिस्तानी लष्कराने दिला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी लष्कर अफगाणिस्तावर हल्ला करणार का? असा चर्चा सुरू झाल्या आहेत.
तालिबान सरकारने दोहा कराराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ चांगलेच संतापले आहेत. टीटीपीचे दहशतवादी सध्या पाकिस्तानमध्ये जीवघेणे हल्ले करत आहेत आणि त्याची पाकिस्तानी लष्कराला मोठी किंमत मोजावी लागत आहे. यापूर्वीच्या एका संभाषणात तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानला दोहा कराराअंतर्गत आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देताना सांगितले होते की त्यांनी इस्लामाबादशी कोणताही शांतता करार केलेला नाही. त्यावरून आता वातावरण गरम झाले आहे.
'तालिबानने टीटीपीवर कारवाई करा'
पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी आपला देश आपल्या भूमीचा वापर करू देणार नाही, असे जबिउल्लाह म्हणाले. तालिबानने पाकिस्तानला मुस्लिम आणि मित्र देश असे वर्णन केले आहे. तेहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची तालिबानकडे पाकिस्तान वारंवार मागणी करत आहे, पण त्याचा आजपर्यंत काहीही उपयोग झालेला नाही. टीटीपीचे दहशतवादी अफगाणिस्तानच्या भूमीवर सातत्याने हल्ले करत आहेत. गेल्या आठवड्यातच 12 सैनिकांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानच्या लष्कराने शेजारील देशात दहशतवाद्यांना दिलेल्या आश्रयाबद्दल संताप व्यक्त केला होता.
पाकिस्तानी लष्कराने तालिबानला धमकी दिली आहे की, टीटीपीवर प्रभावी हल्ला करण्यासाठी त्यांच्याकडे अफगाणिस्तानात घुसण्याचा पर्याय आहे. सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते फरहातुल्लाह बाबर म्हणाले की, हे अतिशय त्रासदायक आहे. पण बाबर म्हणाले, 'तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, तालिबानने दोहा करारावर अमेरिकेसोबत स्वाक्षरी केली होती, पाकिस्तानशी नाही. तालिबानचे पाकिस्तानबाबतचे धोरण वेगळे आहे. दोहा करार तालिबानला काही दहशतवाद्यांशी बांधून ठेवतो असे आहे का? असा सवाल त्यांनी केला. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही त्यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे पाकिस्तान अफगाणिस्तावर हल्ला करणार का याकडे जगाचे लक्ष आहे.