कोरोना महामारीला रोखण्यासाठी संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यात अनेक देशांकडून कोरोना विरोधी लसींची निर्मिती केली जात आहे. बहुतेक देशांमध्ये आता सर्वच वयोगटातील नागरिकांना कोरोना विरोधी लस दिली जात आहे. यातच आता पाकिस्ताननंही स्वदेशी कोरोना लसीची निर्मिती केली आहे. पाकिस्ताननं या लसीला PakVac असं नाव दिलं आहे. पाकिस्ताननं ही लस बाजारात तर आणलीय पण ही लस कोरोना विषाणू विरोधात नेमकी किती प्रभावी आहे? किती जणांवर याची चाचणी घेण्यात आलीय? चाचण्याचा नेमका परिणाम काय आहे? याबाबतची कोणतीही माहिती प्रसिद्ध केलेली नाही.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय कमांड अँड ऑपरेशन सेंटरचे प्रमुख असद उमर यांनी PakVac लस लॉन्च केली आहे. याशिवाय पाकिस्तान लवकरच कोरोनावरील महत्वपूर्ण औषध तयार करण्यासाठी सक्षम होणार आहे, असा दावा केला आहे. पाकिस्तानात तयार करण्यात आलेल्या या लसीची अतिशय काटेकोर पद्धतीनं चाचणी, गुणवत्ता आणि तपासणी झालेली आहे, असंही ते म्हणाले.
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात चीननं पाकिस्तानसोबतची मैत्री निभावली असल्याचंही उमर म्हणाले. याआधीपासूनच पाकिस्तान आणि चीनचे मैत्रीचं संबंध राहिले आहेत आणि कोरोना काळात चीननं भरीव मदत करुन ते सिद्धही करुन दाखवलं आहे. यासोबतच कोरोना विरोधी स्वदेशी लस तयार करण्याचं संपूर्ण श्रेय राष्ट्रीय आरोग्य संस्थेला जातं, असंही उमर म्हणाले.
पाकिस्तान सरकार जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येणाऱ्या ईद-उल-अजहाच्या (बकरी ईद) पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागू नये यासाठी लसीकरणात वेग आणण्याचा प्रयत्न करणार आहे. पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री असद उमर यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉकडाऊनची नामुष्की पुन्हा ओढावू नये यासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वेगानं लसीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे.