इस्लामाबाद: आर्थिक अडचणींमुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे इम्रान खान यांच्या नेतृत्त्वाखालील पीटीआय सरकार नव्या संकटात सापडलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या खनिज तेलाचे दर वाढले आहेत. त्यामुळे अनेक देशांपुढे आव्हानात्मक परिस्थिती आहे. तेलासाठी आयातीवर अवलंबून असलेल्या देशांच्या समस्या वाढल्या आहेत.
पाकिस्तानी बँकांनी तेल कंपन्यांना अधिक जोखीम असलेल्या गटात ठेवलं आहे. या कंपन्यांना कर्ज देण्यास बँकांनी नकार दिला आहे. पाकिस्तानकडे असलेला डिझेलचा साठा संपत आला. केवळ पाच दिवस पुरेल इतकंच डिझेल सध्या पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्यापुढे नवं आव्हान निर्माण झालं आहे. एकीकडे विरोधक आक्रमक झाले असताना डिझेलचा साठा अपुरा असल्यानं महागाई वाढण्याचा धोका आहे.
पाकिस्तानात महागाई ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या (सीपीआय) मदतीनं मोजली जाते. सध्या महागाई २४ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर आहे. महागाईचा दर १३ टक्क्यांवर पोहोचला आहे. वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जानेवारी २०२० मध्ये सीपीआय १४.६ टक्के होता. त्यानंतर प्रथमच पाकिस्तान इतक्या महागाईचा सामना करत आहे.
पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी खान सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यावर निशाणा साधताना, मी कांदे, बटाट्यांचे दर नियंत्रणात आणण्यासाठी राजकारणात आलेलो नाही, असं खान म्हणाले. मात्र दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तू महाग होत असल्यानं सर्वसामान्य जनता त्रासली आहे.