Pakistan Debt Loans: दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानवरील कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर सध्याच्या घडीला असलेले एकूण कर्ज आणि देणी सुमारे ८१.२ ट्रिलियन रुपयांवर पोहोचली आहेत. गेल्या वर्षी पाकिस्तानचे कर्ज २७ टक्क्यांनी वाढले आहे. पाकिस्तानवरील कर्जाचा हा डोंगर आता नव्या सरकारसाठी मोठी समस्या बनणार आहे. निवडणुकीनंतर पाकिस्तानमध्ये सरकार स्थापनेबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने सोमवारी आपल्या ताज्या बुलेटिनमध्ये देशाच्या एकूण कर्ज आणि दायित्वांमध्ये वाढ झाल्याचे उघड असून गेल्या एका वर्षात पाकिस्तानचे कर्ज १७.४ ट्रिलियन रुपयांनी वाढले असल्याचे स्पष्ट केले आहे.
काळजीवाहू सरकारवर फोडलं खापर
पाकिस्तानी सेंट्रल बँकेने सांगितले की एकूण कर्ज आणि दायित्वे आता ८१.२ ट्रिलियन रुपयांवर पोहोचली आहेत. त्यावर ४.६ ट्रिलियन रुपयांचे दायित्व आहे. डिसेंबर २०२२ पासून पाकिस्तानचे कर्ज जवळपास दररोज सरासरी ४८ अब्ज रुपयांनी वाढते आहे. ही पाकिस्तानमधील सर्वाधिक मासिक कर्ज वाढ आहे. या महिन्यात ५ महिने काळजीवाहू सरकार आहे, ज्याचे प्रमुख अन्वारुल हक काकर सतत परदेश दौरे करत राहिले आणि देशावरील कर्जाचा डोंगर वाढतच गेला.
सध्या प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर किती कर्ज?
पाकिस्तानमध्ये निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापनेसाठी रस्सीखेच सुरू आहे. बिलावल भुट्टो आणि नवाझ शरीफ यांच्यात चेकमेटचा खेळ सुरू आहे. या निवडणुकीच्या खेळातील खरा खेळाडू इम्रान खान आहे. 'कॅप्टन' इम्रान खानने तुरुंगातूनच पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना आपल्या शक्तीची ओळख करून दिली आणि आता तेच खरे 'किंग मेकर' बनले आहेत. पाकिस्तानमध्ये कोणतेही सरकार स्थापन झाले, तरी त्यांना कर्जाच्या महाकाय संकटाला तोंड द्यावे लागणारच आहे. २०२२-२३ या वर्षात कर्जाचा बोजा लक्षणीयरित्या वाढल्याचेही पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने उघड केले आहे. त्यानुसार, पाकिस्तानच्या लोकसंख्येनुसार आता प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावरील कर्ज सुमारे २ लाख ७१ हजार ६२४ रुपयांवर पोहोचले आहे. हे कर्ज २५.२ टक्क्यांनी वाढले आहे.