इस्लामाबाद – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमावाद कायम चर्चेत राहिला आहे. काश्मीर मुद्द्यावरुन अनेकदा दोन्ही देश आमनेसामने येतात. परंतु काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे हे मानण्यास पाकिस्तान तयार नाही. त्यामुळे पाकिस्तान जागतिक पातळीवर नेहमी रडीचा डाव खेळत असतं. आता पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी घेतलेल्या एका अजब निर्णयामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत.
पाकिस्तानच्या प्रत्येक न्यूज चॅनेलवर दर्शकांना देशाचा चुकीचा नकाशा दाखवला जाणार आहे. पंतप्रधान इमरान खान यांनी रोज रात्री ९ च्या बुलेटिनच्या अगोदर पाकिस्तानचा नकाशा दाखवण्यास बंधनकारक केले आहे. पाकिस्तानी इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरणाने याबाबत अधिसूचना जारी करत सर्व खासगी आणि सरकारी न्यूज चॅनेलला मागील ऑगस्टमध्ये जारी केलेला नकाशा दाखवण्यास सांगितले आहे. वास्तविक हा नकाशा चुकीचा आहे कारण त्यात भारताच्या काही भागांचाही समावेश करण्यात आला आहे.
भारताच्या ‘या’ परिसरावर दावा
अधिसूचनेत म्हटलं आहे की, नवीन नकाशा(Pakistan New Map) रोज बुलेटिनच्या आधी २ सेकंद प्रदर्शित करावा लागेल. मागील ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान इमरान खान(Imran Khan) यांनी पाकिस्तानचा नवा नकाशा जारी केला होता. ज्यात जम्मू काश्मीर, लडाखच नव्हे तर गुजरातचा जुनागड परिसरावरही दावा केला होता. हा वादग्रस्त नकाशा भारत आणि नेपाळ यांच्यात सुरु असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर जारी केला होता. पाकिस्तानी मीडिया नियामक प्राधिकरण(PEMRA) यावर न्यूज चॅनेलविरोधात कठोर निती अंवलबल्याचा आरोप आहे.
PEMRA विरोधात एकत्र झाले पत्रकार
२०१९ मध्ये ११ टीव्ही अँकरद्वारे पेमराच्या अधिसूचनेविरुद्ध लाहोर हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यावरुन प्रचंड वाद झाला होता. पेमरानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं होतं की, अँकर टॉक शोवेळी स्वत:चं मत मांडू नये. त्यांची भूमिका मध्यस्थीची हवी. टॉक शोमध्ये आमंत्रित करणाऱ्या पाहुण्यांची निवड योग्यरितीने करावी असं सांगितले होते. त्याविरोधात ११ टीव्ही अँकरने हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.