US China Declined to Receive Pakistan’s Mango: कोरोना महामारीमुळे आर्थिक तंगीत सापडलेल्या पाकिस्ताननं जागतिक महासत्ता देशांचं मन जिंकण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं एकूण ३२ देशांना भेटवस्तू म्हणून आंबे पाठवले. पण पाकिस्तानचा मित्र देश म्हणून समजल्या जाणाऱ्या चीननं पाकिस्ताननं पाठवलेले आंबे परत पाठवले आहेत. त्याचसोबत जागतिक महासत्ता म्हणून ओळख असलेल्या अमेरिकेननंही पाकिस्तानची भेट नाकारली आहे. त्यामुळे पाकिस्तानची आंबे पाठवून देशांना आकर्षित करण्याच्या खेळीवर पाणी फेरलं गेलं आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहीतीनुसार बुधवारी अनेक देशांना वेगवेगळ्या प्रकारचे आंबे भेट म्हणून पाठविण्यात आले. पण चीन आणि अमेरिकासह काही देशांनी भेट स्विकारण्यास मनाई केली आहे. यामागे कोरोना संबंधिच्या क्वारंटाइन नियमांचं कारण देण्यात आलं आहे. माध्यमांमधील माहितीनुसार, पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिष अल्वी यांनी ३२ प्रमुख देशांना 'चौंसा' जातीचे आंबे भेट म्हणून पाठवले होते. या आंब्याच्या पेट्या इराण, तुर्की, ब्रिटन, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि रशियाला देखील पाठविण्यात आल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. पाकिस्तानच्या यादीत फ्रान्सचे राष्ट्रपती अॅम्युनल मॅक्रो यांचंही नाव समाविष्ट होतं. पण यावर फ्रान्सकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
कुणी कुणी भेट नाकारली?समोर आलेल्या माहितीनुसार, चीन आणि अमेरिकेसह कॅनडा, नेपाळ आणि श्रीलंकेनं पाकिस्ताननं दिलेल्या आंब्याच्या पेट्या स्विकारण्यास नकार दिला आहे. दरम्यान, भेट स्विकारू शकत नसल्याबद्दल या देशांनी सुद्धा खेद व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या देशांनी भेट परत पाठवल्याच्या मुद्द्यावर पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
पाकिस्तानात महागाईचं भयाण रुपपाकिस्तान सध्या कोरोना महामारीसोबत महागाईच्या महामारीचाही सामना करत आहे. याशिवाय देशावर इतर देशांचं कर्ज देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाकिस्तानातील जनतेला मोठ्या अडचणींना आणि दैनंदिन वस्तूंच्या अवाजवी किंमतीला सामोरं जावं लागत आहे. देशातील दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किंमती देखील गगनाला भिडल्या आहेत.