Bilawal Bhutto Pakistan, BJP RSS : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल अतिशय खालच्या पातळीवरची टीका करणारे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री काही केल्या सुधरण्यास तयार नाहीत. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी शुक्रवारी भारतात आले. भारताच्या भूमीवर पाऊल ठेवल्यानंतर बिलावलची देहबोली पाहून असे वाटले की, कदाचित दोन शेजारी देशांमधील संबंध पुन्हा हळूहळू रुळावर आणण्याविषयी ते बोलतील. पण SCO शिखर परिषदेत असे काहीही झाले नाही. उलट पाकिस्तानला दहशतवादाबद्दल बरेच सुनावण्यात आले. त्यामुळे भारतातून पाकिस्तानात परत जाताच बिलावलने पुन्हा एकदा गरळ ओकत, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्याविरोधात काही आरोप केले.
पाकिस्तानात पोहोचल्यावर बिलावल म्हणाला की, भाजप भारतात प्रत्येक मुस्लिम दहशतवादी असल्याचा खोटा प्रचार करत आहे. मीडियाशी बोलताना त्याने सांगितले, "भाजपा आणि आरएसएस खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. जगभरातील सर्व मुस्लिम हे दहशतवादी असल्याचे त्यांना जाहीर करायचे आहे. ते पाकिस्तानी लोकांनाही दहशतवादी म्हणत आहेत. हा खोटारडेपणा संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे."
पाकिस्तानात परतताच बिलावलने धर्माचा मुद्दा उपस्थित केला. भारत मुस्लिमांशी भेदभाव करत असल्याचा आरोप त्याने केला. मुस्लिमांची बदनामी केल्याचा आरोपही भाजपावर त्याच्याकडून करण्यात आला. तो म्हणाला की, येथे हिंदू लोक पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या तिकिटावर लढतात आणि सदस्य होतात. त्यांना मंत्रीपद मिळते. पण भाजपकडून एकही मुस्लिम हा संसदेचा सदस्य होत नाही.
दरम्यान, बिलावल भुत्तोचे राजकीय कर्तृत्व काहीच नाही हे सर्वश्रृत आहे. वारसाहक्काने जे मिळाले ते सांभाळणेही त्याला कठीण झाले आहे. तसेच, पाकिस्तानवर आता चर्चा करण्यासारखे राहिलेले नाही. पण जागतिक महासत्ता बनलेल्या भारताविरुद्ध शेजारील देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी काही तरी विरोधात बोलायला हवे असा पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांचा आग्रह असतो असे राजकीय जाणकार सांगतात. त्यानुसार भारतातून परत आल्यानंतर लगेचच बिलावलने भारत, भाजपा, आरएसएस यांच्याविरोधात आरोप करण्यास सुरूवात केली असल्याचे दिसत आहे.