नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे. यामुळे पाकिस्तान सैरभैर झाला आहे. पाकिस्ताननेभारत सरकारला युद्धाची धमकी दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी युद्धाची भाषा केली आहे. फवाद चौधरी म्हणाले, 'संसदेत बेकार विषयांवर चर्चा करण्याऐवजी आपल्याला भारताला खून, अश्रू आणि घामाने उत्तर दिले पाहिजे. आम्हाला युद्धासाठी तयार राहायला हवे.'
सोमवारी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचे प्रस्तावित विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यावरुन पाकिस्तानचे सरकार आणि येथील राजकीय पक्षांमध्ये धमका उडाला आहे. पाकिस्तानच्या विरोधी पक्षांनी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर निशाणा साधला आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी इमरान खान यांना टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या, 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करणार असल्याचे सांगून इमरान खान यांना मूर्ख बनविले. भारत काय रणनिती आखत आहे, याचा अंदाज लागू शकला नाही.'
दरम्यान, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानमधून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानाच्या एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात अब्दुल बासित यांनी सांगितले की, 'ऑक्टोबर 2014 मध्ये त्यांची भाजपाचे वरिष्ठ नेते राम माधव यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी काश्मीरसंबंधी भारताने मोठा निर्णय घेण्याबाबत तयारी केली होती असे राम माधव यांनी म्हटले होते.' जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 आणि कलम 35 ए हटविण्यात येईल. तसेच, पाकव्याप्त काश्मीर सुद्धा भारत परत घेईल, असे राम माधव यांनी म्हटल्याचे पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी सांगितले.