इस्लामाबाद: जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानं पाकिस्तानी नेत्यांचा जळफळाट झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून दररोज भारतविरोधी विधानं केली जात आहेत. पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त पातळी सोडून टीका केली आहे. मात्र मोदींवर निशाणा साधणारे हुसेन पाकिस्तानातच ट्रोल झाले. अनेकांनी ट्विटरवर त्यांच्या विधानाचा निषेध केला. आज पंतप्रधान मोदींचा ६९ वा वाढदिवस आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांच्या प्रमुखांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र पाकिस्तानचे मंत्री फवाद हुसेन पातळी सोडून मोदींची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. 'आजचा दिवस आपल्याला गर्भनिरोधकांचं महत्त्व सांगतो,' असं ट्विट हुसेन यांनी केलं. यापुढे त्यांनी #मोदीबर्थडे असंदेखील लिहिलं आहे. हुसेन यांच्या ट्विटवर जोरदार टीका होत आहे. अनेकांनी यावरुन मीम्स तयार करत हुसेन यांना लक्ष्य केलं आहे. हुसेन यांनी केलेली टीका पाकिस्तानमधील सुशिक्षित वर्गाला आवडलेली नाही. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील प्राध्यापिका आएशा अहमद यांनी हुसेन आणि पंतप्रधान इम्रान खान यांचा खरपूस समाचार घेतला आहे. 'पाकिस्तान सरकारचे एक प्रतिनिधी एका स्वतंत्र देशाच्या पंतप्रधानांबद्दल कशी भाषा वापरत आहेत? इतकंच शत्रूत्व दाखवायचं असेल, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, लोकशाहीच्या मार्गानं स्पर्धा करा. पातळी सोडून टीका करुन जिंकणं गौरवास्पद नसतं मंत्रिमहोदय,' अशा शब्दांमध्ये अहमद यांनी हुसेन यांना सुनावलं आहे.