इस्लामाबाद: हिंदूंबद्दल केलेलं अपमानास्पद विधान पाकिस्तानच्या मंत्र्याला महागात पडलं आहे. आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल पंजाब प्रांताचे सांस्कृतिक मंत्री फय्याजुल हसन चौहान यांना राजीनामा द्यावा लागला. चौहान यांच्या विधानाचे पाकिस्तानात तीव्र पडसाद उमटले होते. त्यांच्यावर जनतेतून आणि पक्षातून जोरदार टीका झाली होती. चौहान यांनी एका पत्रकार परिषदेत हिंदूंचा अपमान करणारी विधानं केली. हिंदू समाज गायीचं मूत्र पितो, असं चौहान म्हणाले होते. यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. पाकिस्तानात ट्विटरवर #SackFayazChohan ट्रेंडिगमध्ये होता. अनेकांनी हा हॅशटॅग वापरुन चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
हिंदूंचा अपमान भोवला; पाकिस्तानी मंत्र्यावर राजीनामा देण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 7:20 PM