इस्लामाबाद:पाकिस्तानदहशतवादाला खतपाणी घालतं तसंच दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. तालिबानी दहशतवाद्यांची कुटुंबं इस्लामाबादमध्येच राहतात, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने दिली आहे. पाकिस्तान मीडिया रिपोर्टमधून याबाबत माहिती मिळाली आहे. (pakistan minister sheikh rashid ahmed says family of taliban terrorist lives in islamabad)
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या शेख रशिद अहमद यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचं पितळ उघडं पाळलं आहे. राशिद यांनी कबुल केले आहे की, अफगाणिस्तानातील तालिबादी दहशतवाद्यांची कुटुंबं पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये राहतात. एवढंच नव्हे, तर तालिबानी दहशतवाद्यांवर पाकिस्तानी रुग्णालयांमध्ये उपचारही केले जातात, असंही राशिद यांनी म्हटले आहे.
तालिबान्यांमुळे अफगाणिस्तानातील हिंसाचारात वाढ!
अफगाणिस्तानध्ये सध्या अमेरिकेचे तैन्य तैनात असून, ते लवकरच मायदेशात परतणार असल्याचे वृत्त आहे. तालिबान्यांच्या हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानातील हिंसाचारात वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, तालिबानी हिंसाचारासाठी पाकिस्तानची मदत घेत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून वारंवार फेटाळला जात आहे. अशातच आता मंत्री शेख रशिद अहमद यांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेख रशिद अहमद यांनी ही बाब स्पष्ट केली असल्याचं सांगितलं जात आहे.
धोका अद्याप कायम? जम्मूमध्ये पुन्हा दिसला ड्रोन; २४ तासांतील दुसरी घटना
इस्लामाबादमधील ‘या’ उच्चभ्रू भागांत वास्तव्य
शेख रशिद अहमद यांनी म्हटलं आहे की, तालिबानी दहशतवाद्यांची कुटुंबं रवात, लोई बेर, बारा काहू आणइ तरनोल या भागांमध्ये राहतात, असं सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, हा भाग प्रसिद्ध आणि उच्चभ्रू समजला जातो. पाकिस्तान तालिबान्यांशी असलेले संबंध नाकारत असला, तरी राशिद खान यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानचं बिंग पुन्हा एकदा फुटलं आहे.
दरम्यान, यापूर्वी इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गाझा पट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांना पाकिस्तान सैन्याकडून प्रशिक्षण दिलं जात असल्याचा मोठा दावा पाकिस्तानचे खासदार राजा जफर उल हक यांनी केला होता. खासदार राजा जफर उल हक हे पाकिस्तानचे माजी मुसद्दी अधिकारी होते. पाकिस्तानी सैन्याकडून फार आधीपासून हमास गटाला प्रशिक्षण दिलं जात आहे. पाकिस्तान सैन्याचे स्पेशल कमांडो युनिट एसएसजीचे एक बटालियन याआधीपासून प्रशिक्षण केंद्र चालवण्यासाठी गाझामध्ये असल्याचा दावाही त्यांनी केला होता.