अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर तालिबानींनी कब्जा केल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी देशाबाहेर पळून गेले असून, त्यामुळे अफगाण सैनिक आणि पोलिसांनीही आपली शस्त्रे टाकून दिली आहेत. ते तालिबानींना शरण जात आहेत. तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. व्हिसा, पासपोर्ट नसूनही ते विमानतळाच्या दिशेने पळत आहेत. याच दरम्यान आम्हीच तालिबानला मदत केल्याची कबुली पाकिस्तानच्या एका मंत्र्याने दिली आहे.
पाकिस्तानच्या इमरान खान सरकारमध्ये मंत्री असलेल्या शेख राशिद यांनी आता सर्वांसमोर जाहीरपणे तालिबानचं समर्थन केलं आहे. आम्ही तालिबानचे संरक्षक असून सर्वकाही केल्याचं म्हटलं आहे. "आम्ही बराच काळ तालिबानी नेत्यांना संरक्षण दिलेलं आहे. आमच्याकडे ते शरणार्थी म्हणून आले होते. त्यांनी इथेच शिक्षण घेतलं आणि इथेच आपलं घर वसवलं. आम्ही तालिबानसाठी सर्वकाही केलं" असल्याचं देखील शेख राशिद यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानकडून सातत्याने तालिबान्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांचं कौतुक करणारी विधाने केली जात आहेत.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनीही माहिती दिली होती की तालिबान काही दिवसातच देशात आपलं सरकार स्थापन करतील. त्यानंतर काही काळातच तालिबाननेही याची पुष्टी केली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी आधीही तालिबानच्या समर्थनार्थ अनेकदा विधानं केली होती. नेतेच नाही तर पाकिस्तानच्या खेळाडूंनीही तालिबान्यांचं समर्थन केलं आहे. माजी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदीने तालिबान यावेळी सकारात्मक दृष्टिकोन घेऊन आला आहे. ते महिलांना काम करण्याची परवानगी देत आहेत आणि क्रिकेटचंही समर्थन करत आहेत असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"तालिबान्यांनी दिली भयंकर शिक्षा, मृतदेह हेलिकॉप्टरला लटकवला?"; 'त्या' Video मागचं नेमकं 'सत्य'
अमेरिकेला मदत केल्याच्या रागातून तालिबान्यांची एका व्यक्तीला हेलिकॉप्टरमधून फासावर लटकवले. कंदहार परिसरात घिरट्या घालत असलेल्या हेलिकॉप्टरचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तालिबान्यांनी हेलिकॉप्टरला मृतदेह लटकल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर अमेरिकन सैन्याच्या (American Forces) वापसीनंतर विमानतळावर एक हेलिकॉप्टर उडत होतं. याला एक व्यक्ती लटकलेला होता. अमेरिकी सैन्याची मदत केल्याप्रकरणी या व्यक्तीला तालिबाननं शिक्षा दिली आहे आणि सैन्य वापसीनंतर तालिबानने आपला खरा रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे असा दावा केला आहे. मात्र आता अफगाणिस्तानच्या पत्रकारांनी या व्हायरल व्हिडिओबाबतचं वेगळंच सत्य समोर आणलं आहे.
ज्या हेलिकॉप्टरला व्यक्ती लटकला होता ते अमेरिकी हेलिकॉप्टर हॉक होतं. सोशल मीडियावर तालिबानी शिक्षेचा दावा केला जात असतानाच स्थानिक पत्रकारांनी या व्हिडिओमागचं सत्य सांगितल्याने सर्वच जण हैराण झाले. जो व्यक्ती हेलिकॉप्टरला लटकला आहे, तो तब्बल 100 मीटर उंच झेंडा फडकवण्याचं काम करत होता. म्हणजेच त्याला कोणतीही शिक्षा दिली जात नव्हती. हेलिकॉप्टरला लटकलेला व्यक्ती एक तालिबानीच आहे, जो झेंडा लावण्यासाठी लटकलेला होता. हेलिकॉप्टरच्या मदतीने तो हे काम करत होता. मात्र, यात तो यशस्वी झाला नाही.