ऑनलाइन लोकमत -
लाहोर, दि. ५ - पाकिस्तान पोलिसांनी 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह रोखत तिची सुटका केली आहे. कुटुंबातील वाद सोडवण्यासाठी या अल्पवयीन मुलीचा 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाशी विवाह करुन देण्यात येत होता. भरपाई म्हणून हे लग्न करुन देण्याचा हुकूम देणा-या 4 गावक-यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
पंजाब प्रांतात हा सोहळा पार पडत होता. याठिकाणी संबंध सुधारण्यासाठी, भरपाई म्हणून तसंच भांडण मिटवण्यासाठी लग्न लावून देण्याची प्रथा आहे. ग्रामपंचायतीच्या मंडळींनी दोन कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी हा विवाह करुन देण्यास सांगितलं होतं. ग्रामपंचायतीच्या या चारही सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पिडीत मुलीच्या वहिनीचा आरोग्याच्या समस्येमुळे मृत्यू झाला होता मात्र मृत्यू झालेल्या मुलीच्या घरच्यांना हत्या केल्याचा संशय होता अशी माहिती पोलिस अधिक्षक रशीद यांनी दिली आहे. 3 मार्चला ग्रामपंचायतीने या पिडीत मुलीला भरपाई म्हणून तिच्या वहिनीच्या घरच्यांना देण्याचे आदेश दिले होते. तिच्या वहिनीच्या 14 वर्षीय चुलत भावाशी तिचं लग्न करुन देण्यास तसंच 1 लाख 50 हजार रुपये देण्यासंही सांगण्यात आलं होतं. पोलिसांनी कारवाई करत अखेर हा विवाह रोखला आणि अटकेची कारवाई केली.