पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) सांगितले की, 25 जूनपासून पावसाळा सुरू झाल्यापासून पाकिस्तानमध्ये किमान 101 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 180 जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था सिन्हुआच्या रिपोर्टनुसार, NDMA नुसार, पंजाब प्रांत सर्वाधिक प्रभावित झाला असून 57 मृत्यू आणि 118 जखमी झाले आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत मुसळधार पावसामुळे लाहोरसह पंजाबमध्ये 53 घरं उद्ध्वस्त झाली आहेत.
मुख्यमंत्री मोहसिन नकवी यांनी "रेकॉर्ड ब्रेक" म्हणून वर्णन केलेल्या लाहोरमधील मुसळधार पावसामुळे शहरात पूर आला, अनेक भाग पाण्याखाली गेले आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. रावळपिंडीमध्ये बुधवारी 12 तासांहून अधिक काळ मुसळधार पाऊस पडला, परिणामी नद्या आणि नाल्यांमधील पाण्याची पातळी धोकादायक पातळीपर्यंत वाढली.
बुधवारी शहरात मुसळधार पावसामुळे तात्पुरत्या तंबूत राहणाऱ्या मजुरांवर बांधकाम सुरू असलेल्या पुलाची भिंत कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पर्जन्यमापक केंद्रांवर शहरातील अनेक भागात 200 मिमी पर्यंत पावसाची नोंद झाली, ज्यामुळे पूर आला आहे. NDMA ने सांगितले की, खैबर पख्तुनख्वा प्रांतात पावसाशी संबंधित वेगवेगळ्या अपघातांमध्ये 25 जण ठार आणि 41 जण जखमी झाले आहेत.
मुसळधार पावसामुळे प्रांतात 60 घरांचे नुकसान झाले. सिंध प्रांतात जूनच्या सुरुवातीला आलेल्या वादळात एका घरावर वीज कोसळून किमान 10 जण ठार झाले तर दोन जण जखमी झाले. NDMA आकडेवारी दर्शवते की नैऋत्य बलुचिस्तान प्रांतात सहा लोक ठार आणि 13 इतर जखमी झाले आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणखी तीन जणांचा मृत्यू झाला, जिथे अतिवृष्टीमुळे पाच लोक जखमी झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.