लाहोर, दि. 11 - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागल्यानंतर आता शरीफ कुटुंबातच सत्तासंघर्ष सुरु झाला आहे. नवाझ शरीफ यांचा लहान भाऊ शहाबाज शरीफ यांच्या पत्नीने गुरुवारी टि्वटरवरुन नवाझ शरीफ यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. नवाझ सुमार दर्जाच्या सल्लागारांचे ऐकत असून त्यांची काळजी घेत आहेत असे तहमिना दुर्रानीने टि्वटमध्ये म्हटले आहे. नवाझ शरीफ यांच्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून शहाबाज शरीफ यांच्याकडे पाहिले जात होते.
शहाबाज शरीफच पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान होतील असा अनेकांना विश्वास होता. पण शहाबाज पाकिस्तानी संसदेचे सदस्य नसल्याने त्यांच्या जागी शाहीद अब्बासी यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. त्यावेळी शाहीद अब्बासी यांची शहाबाज यांची संसदेवर निवड होईपर्यंत पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलीय असे सांगण्यात आले होते. पण बुधवारी नवाझ यांनी शाहीद अब्बासी यांची नियुक्ती कामचलाऊ किंवा तात्पुरती नसल्याचे स्पष्ट केले.
त्यामुळे शहाबाज यांच्या कुटुंबाने नवाझ यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. बुधवारी रोड शो साठी इस्लामाबादहून लाहोरला रवाना होताना नवाझ यांनी पुढच्या निवडणुकीपर्यंत शाहीद अब्बासी यांनी पंतप्रधानपदी कायम राहावे अशी इच्छा बोलून दाखवली. त्यावेळीच सर्व चित्र स्पष्ट झाले.
मागच्या आठवडयापासूनच पाकिस्तानात नवाझ शरीफ यांनी स्वत:च आपले बंधू शहाबाज शरीफ यांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवल्याची चर्चा रंगली आहे. शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षातील अनेक नेत्यांचे तसे ठाम मत असल्याचे डॉनने वृत्त दिले होते. नवाझ शरीफ यांनी आपले बंधू शहाबाज यांनाच दूर ठेवले नाही तर, शहाबाज यांचा मुलगा हमझा शरीफचेही स्वप्न मोडले.
शहाबाज यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर पंजाब प्रातांची जबाबदारी आपल्याला मिळेल असा हमजा याचा कयास होता. पण पंतप्रधानपदी शाहीद अब्बासी यांच्या निवडीमुळे तूर्तास पिता-पुत्राचे स्वप्न भंगले. शहाबाज शरीफ पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री असून हा प्रांत पीएमएल-एऩ पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.