इस्लामाबाद:पाकिस्तानातील हैदराबादमध्ये एका हिंदू समाजातील स्वच्छता कर्मचाऱ्याला ईशनिंदा केल्याच्या आरोपावरून घरात घुसून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये मोठ्या प्रमाणात जमाव बाल्कनीवर चढून त्या कर्मचाऱ्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. मात्र, यावेळी पीडित घरात लपून बसल्यामुळे त्याचा जीव वाचला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?मुबशीर जैदी नावाच्या पत्रकाराने या घटनेचा व्हिडिओ शेअर केले आहेत. यासोबत लिहिले की, 'अशोक कुमार नावाच्या सफाई कर्मचाऱ्याने कुराणचा अपमान केला. यानंतर मोठ्या संख्येने जमाव त्या व्यक्तीला मारण्यासाठी, त्याच्या घराबाहेर जमा झाला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवले आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'
सफाई कर्मचारी अटकेतया घटनेवर बोलताना पाकिस्तानी पत्रकार आणि स्तंभलेखिका नायला इनायत म्हणाली की, 'पोलिसांनी अशोक कुमारवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अशोकचा दुकानदार बिलाल अब्बासीसोबत काही कारणावरुन वाद झाला होता, यानंतर बिलालने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीत बिलालने अशोक कुमारवर कुराणाचा अपमान केल्याचा आरोप केला. त्यामुळेच अशोकच्या घराबाहेर मोठा जमाव जमा झाला.